मालेगाव : गोवंश हत्त्याबंदी कायद्यांतर्गत दोघांना अटक
By Admin | Updated: March 28, 2015 00:11 IST2015-03-27T23:51:31+5:302015-03-28T00:11:48+5:30
पाच दिवस पोलीस कोठडी

मालेगाव : गोवंश हत्त्याबंदी कायद्यांतर्गत दोघांना अटक
आझादनगर : मालेगाव शहरात बुधवारी झालेल्या गोवंश हत्त्येप्रकरणी सलीम मुन्शीनगर भागातून शुक्रवारी सकाळी दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
बुधवारी गोवंश हत्त्याबंदी कायद्यान्वये आझादनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपींच्या मागावर होते. सकाळी ९ वाजेच्या सुमारास सलीम मुन्शीनगर येथून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (पान ७ वर)
शहरातील तहजिब हायस्कूलसमोर पत्र्यांच्या शेडमध्ये बुधवारी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकून दोन जनावरांचे दीडशे किलो मांस व मुंडके जप्त केले होते. आरोपी फरार झाल्याने पोलीस त्यांचा शोध घेत होते. राज्यात युती शासनाने गोवंश हत्त्याबंदीचा (सुधारित) कायदा पारित केल्यानंतर राज्यातील पहिलाच गुन्हा मालेगावात घडल्याने खळबळ उडाली होती. तिघा संशयितांविरुद्ध आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक मसुद खान यांना मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस कर्मचारी प्रदीप भाबड, संजय गवारे यांनी सलीम मुन्शीनगरातून मोहम्मद राशीद मोहम्मद अख्तर (३६) रा. बजरंगवाडी आणि अब्दुल अहाद मो. इस्हाक ऊर्फ हमीद लेंडी (२८) रा. मुन्शी साबान नगर यांना अटक केली. त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायाधीश बेग यांनी त्यांना ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (वार्ताहर)