आधारभूत किमतीचा मका मातीमोल
By Admin | Updated: November 21, 2014 00:34 IST2014-11-21T00:21:08+5:302014-11-21T00:34:38+5:30
लिलावाकडे मक्तेदारांची पाठ : कोट्यवधींचा भुर्दंड

आधारभूत किमतीचा मका मातीमोल
नाशिक : वर्षभरापूर्वी मक्याचे बाजारभाव घसरल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने आधारभूत किंमत देऊन खरेदी केलेला हजारो क्विंटल मका आता मातीमोल ठरू पाहत असून, शासन मालकीच्या मक्याच्या लिलावाकडे मक्तेदारांनी पाठ फिरविल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड शासनाला सहन करावा लागणार आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने राज्यात मक्याचे भरघोस उत्पादन झाले, परिणामी भाव गडगडल्याने मका उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचे पाहून आघाडी सरकारने त्याला दिलासा देण्यासाठी मक्याची आधारभूत किंमत जाहीर करून १३०१ रुपये दराने शेतकऱ्यांकडून मका खरेदी केला होता. खुल्या बाजारापेक्षा शासनाच्या आधारभूत योजनेत दोन पैसे जादा मिळत असल्याचे पाहून हजारो शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सुरू केलेल्या केंद्रांवर गर्दी करून मक्याची विक्री केली. दरम्यान, बाजारात मक्याचा तुटवडा निर्माण झाल्यास शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला मका खुल्या बाजारात विक्री करून नुकसान भरून काढण्याचा शाासनाचा इरादा मात्र चालू वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुरता बारगळला. शासनाने अलीकडेच यासंदर्भात राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून आधारभूत योजनेअंतर्गत खरेदी केलेला मका विक्री करण्याचे आदेश देतानाच, तो ज्या भावात खरेदी केला व त्याची साठवणूक, वाहतूक या साऱ्या गोष्टींसाठी आलेला खर्च गृहीत धरून किंमत ठरविण्याचे व त्या दरात विक्री करण्याच्या सूचना दिल्या.