मालेगाव तालुक्यातील २६ हजार हेक्टरवरील मका धोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:17 IST2021-08-13T04:17:59+5:302021-08-13T04:17:59+5:30
तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अल्पशा पावसावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे. तालुक्यातील ८२ हजार १९३ ...

मालेगाव तालुक्यातील २६ हजार हेक्टरवरील मका धोक्यात!
तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अल्पशा पावसावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे. तालुक्यातील ८२ हजार १९३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ७० हजार १७० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. ऑगस्ट महिना उलटत आला आहे. तरीदेखील पावसाचा मागमूस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून मका पिकाकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून मका पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे. यंदाही लष्करी अळी व इतर रोगांच्या आक्रमणामुळे मका पीक बाधित झाले आहे. मका पिकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक औषधांची फवारणी सुरू केली आहे. ही महागडी औषधे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान होत आहे. अस्मानी व सुल्तानी संकटामुळे तालुक्यातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. शासनाच्या कृषी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी मका उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.