कायझन पुरस्काराचा ‘महिंद्रा’ मानकरी
By Admin | Updated: January 24, 2016 23:05 IST2016-01-24T23:00:24+5:302016-01-24T23:05:19+5:30
राज्यस्तरीय स्पर्धा : राज्यातील अनेक कारखान्यांतील ४२५ स्पर्धकांचा सहभाग

कायझन पुरस्काराचा ‘महिंद्रा’ मानकरी
सातपूर : सीआयआयच्या वतीने घेण्यात आलेल्या अकराव्या राज्यस्तरीय कायझन स्पर्धेत राज्यातील अनेक कारखान्यांतील ४२५ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात कायझन एक्सलन्स कन्सिसटन्सी अवॉर्डचा मानकरी नाशिकचा महिंद्रा अॅँड महिंद्रा कारखाना ठरला आहे.
अंबड येथील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या सभागृहात या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन सीआयआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुधीर मुतालिक यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा समितीचे अध्यक्ष अनिल जंगले यांनी स्पर्धा आयोजनाची माहिती दिली.
या स्पर्धेत पुणे, नाशिक, मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, सांगली आदिंसह राज्यातील विविध कारखान्यातील १०३ संघ म्हणजेच ४२५ कर्मचारी सहभागी झाले होते. कारखान्यात काम करताना उपाय योजना केलेल्या नावीन्यपूर्ण कल्पना सादर करण्यात आल्या. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नरेंद्र कोकीळ, सुदीप नायर, सागर विसे, अशोक रत्नपारखी, मिलिंद गुणे, सचिन भालेराव, संजय सराफ, चारुदत्त बगदे, मनोज दिगळूरकर, पी. के. जोशी, दिनेश खिस्ती आदिंनी काम पाहिले. ही स्पर्धा मोठे उद्योग घटक आणि लघु व मध्यम उद्योग घटक या दोन गटात घेण्यात आली. बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे जिंदाल कंपनीचे अध्यक्ष दिनेश सिन्हा, सीआयआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुधीर मुतालिक, अनिल जंगले, अजय विद्याभानू आदि उपस्थित
होते. (वार्ताहर)