पालिका शिक्षण समितीवर महिलाराज
By Admin | Updated: April 27, 2015 23:41 IST2015-04-27T23:37:32+5:302015-04-27T23:41:26+5:30
सोळा सदस्य नियुक्त : बारा महिला सदस्यांना संधी

पालिका शिक्षण समितीवर महिलाराज
नाशिक : महापालिका स्थायी समितीपाठोपाठ शिक्षण समितीवरही महिलाराज पाहावयास मिळणार असून, सोमवारी बोलाविण्यात आलेल्या विशेष महासभेत महापौरांनी नियुक्त केलेल्या १६ सदस्यांमध्ये तब्बल बारा महिला सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, या नियुक्त्यांविरुद्ध न्यायालयात जाण्याची तयारी शिक्षण मंडळाच्या माजी सदस्यांनी चालविली आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार महापालिकेची शिक्षण समिती गठित करण्यासाठी महापौरांनी विशेष महासभा बोलाविली होती. शिक्षण समितीवर सदस्य नियुक्तीप्रक्रिया तौलनिक संख्याबळानुसार राबविण्यात आली. त्यानुसार संबंधित पक्षांच्या गटनेत्यांकडून सदस्यांची नावे मागविण्यात आली होती. महासभेत महापौरांनी यादीनुसार सदस्यांच्या नावांची घोषणा केली. त्यात सत्ताधारी मनसेकडून गणेश चव्हाण, मीना माळोदे, डॉ. विशाल घोलप, अर्चना जाधव व रेखा बेंडकुळे, शिवसेनेकडून हर्षा बडगुजर, मंगला आढाव व माकपातून सेनेत प्रवेश केलेल्या नंदिनी जाधव, कॉँग्रेसकडून वत्सला खैरे व योगीता अहेर, भाजपाकडून ज्योती गांगुर्डे व सिंधूताई खोडे, राष्ट्रवादीकडून उषाताई अहिरे, राजेंद्र महाले व सुनीता निमसे, तर अपक्ष गटाकडून संजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.
नियुक्ती घोषित केल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी ११ महिला सदस्य आहेत. शिक्षण समितीवरही १६ पैकी १३ महिला सदस्यांना संधी मिळाली आहे. ज्या सदस्यांना आजवर कोणतेही पद मिळाले नाही त्यांना शिक्षण समितीवर संधी देण्याचे धोरण सर्वच पक्षांनी राबविले. (प्रतिनिधी)