पालिका स्थायी समितीवर ‘महिलाराज’
By Admin | Updated: March 13, 2015 00:14 IST2015-03-13T00:12:28+5:302015-03-13T00:14:03+5:30
आणखी दोघा महिलांची एन्ट्री : सभापती निवडणुकीचा प्रस्ताव आज होणार रवाना

पालिका स्थायी समितीवर ‘महिलाराज’
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीवरील दोघा सदस्यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागांवर अपक्ष आघाडीच्या शेख रशिदा नूरमोहम्मद आणि सेना-रिपाइं युतीच्या ललिता संजय भालेराव यांची निवड महापौरांनी घोषित केली. स्थायीवर दोघा महिलांच्या एन्ट्रीने आता समितीवर सर्वपक्ष मिळून दहा महिलांना प्रतिनिधित्व मिळाले असून, सभापतिपदासाठी पुरुष सदस्यांकडून दावेदारी होत असली तरी वर्षभर महिलाराज पाहायला मिळणार आहे. दरम्यान, सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी नगरसचिव विभागाकडून विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव शुक्रवारी (दि.१३) रवाना केला जाणार असल्याने पुढील आठवड्यात निवडणूक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीवरील पक्षीय धोरणानुसार अपक्ष आघाडीचे पवन पवार आणि सेना-रिपाइं युतीचे सुनील वाघ या सदस्यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागांवर नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी गुरुवारी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. यावेळी अपक्ष आघाडीकडून शेख रशिदा नूरमोहम्मद, तर सेना-रिपाइं युतीकडून रिपाइंच्या ललिता संजय भालेराव यांची नावे गटनेत्यांकडून आल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी दोहोंची निवड घोषित केली. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या दोघा महिलांच्या निवडीने स्थायी समितीवर आता १६ सदस्यांपैकी दहा सदस्य या महिला असणार आहेत. स्थायीवर मनसेच्या सविता काळे, संगीता गायकवाड व रत्नमाला राणे, राष्ट्रवादीच्या नीलिमा आमले व छाया ठाकरे, कॉँग्रेसच्या विमल पाटील, भाजपाच्या रंजना भानसी, शिवसेनेच्या वंदना बिरारी या प्रतिनिधित्व करत आहेत. उर्वरित सदस्यांमध्ये मनसेचे अनिल मटाले, यशवंत निकुळे, राष्ट्रवादीचे शिवाजी चुंबळे, कॉँग्रेसचे राहुल दिवे, भाजपाचे प्रा. कुणाल वाघ आणि सेनेचे सचिन मराठे यांचा समावेश आहे. महापालिका स्थायी समितीच्या इतिहासात आजवर महिला सभापती होऊ शकलेली नाही. यंदा मनसेकडून अनिल मटाले यांच्याबरोबरच संगीता गायकवाड यांचे नाव पुढे आले असल्याने इतिहास घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय राष्ट्रवादीकडूनही अपक्ष शेख रशिदा यांचे नाव पुढे करून डावपेच आखले जात असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, स्थायी समिती मनसेकडेच कायम राखण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असून, राष्ट्रवादीतूनही दावेदारी केली जात आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत चुरस बघायला मिळणार आहे. (प्रतिनिधी)