महाराष्ट्राचा विकासदर गुजरातपेक्षा अधिक
By Admin | Updated: April 4, 2016 00:10 IST2016-04-03T23:35:36+5:302016-04-04T00:10:55+5:30
देवेंद्र फडणवीस : भारतीय जनता पार्टी विभागीय कार्यकारिणी कार्य समिती उद््घाटनप्रसंगी प्रतिपादन

महाराष्ट्राचा विकासदर गुजरातपेक्षा अधिक
नाशिक : राज्यात गेल्या वर्षी कृषी विकासदर उणे १६ टक्के झाला होता. मात्र, दरम्यानच्या काळात राज्य सरकारने सर्वच क्षेत्रात घेतलेल्या परिवर्तनवादी निर्णयांमुळे गेल्या पंधरा वर्षांत प्रथमच गुजरातला मागे टाकून महाराष्ट्राचा विकासदर ८ टक्क्यांवर गेला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकारचा विरोध नाही, मात्र कॉँग्रेसने कर्जमाफी देऊन उपयोग झाला नाही. आघाडी सरकार राज्यात असताना २०१२ मध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या असे सांगून त्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले.
भाजपाच्या विस्तारित प्रदेश कार्य समितीच्या बैठकीला रविवारी सकाळी पंचवटीतील स्वामी नारायण मंदिराच्या सभागृहात प्रारंभ झाला. या बैठकीच्या उद््घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे होते, तर केंद्रीयमंत्री हंसराज अहिर, पक्षाच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, सहायक प्रभारी राकेश सिंग, राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे, सहकारमंत्री चंद्रकात पाटील, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यात भाजपाची सत्ता आली तेव्हा सर्व प्रथम २५ हजार गावांमध्ये दुष्काळ होता. त्यानंतर दुसऱ्या वर्षी चाळीस हजार गावांपैकी २७ हजार गावांमध्ये दुष्काळ आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत पहिल्या वर्षी साडेपाच टक्के असलेला राज्याने आठ टक्के विकासदर केला असून, देशाच्या विकासदरापेक्षा तो अधिक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. विरोधक सध्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करीत आहेत. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची सर्व संकटे संपतात असे होत नाही. २००८ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर आत्महत्त्या थांबल्या नाहीत, तर उलट २०१२ मध्ये सर्वाधिक ४ हजार तीनशे शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याचे सांगून या कर्जाचा उपयोग शेतकऱ्यांपेक्षा कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बुडविलेल्या बॅँका आणि सहकारी सोसायट्यांवर झाल्याचा आरोप त्यांनी केला. २००८ मध्ये एकाच वर्षी ६ हजार ९०० कोटी रुपयांची माफी दिल्यानंतर आत्महत्त्याग्रस्त जिल्ह्यांना केवळ ९०० कोटी रुपये मिळाले, या उलट राज्यशासनाने एका वर्षात ८ हजार कोटी रुपयांची थेट मदत केली असे सांगून शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या थांबविण्यासाठी सरकारने शाश्वत विकासावर भर दिला असून, शेततळ्यातून ७९ हजार शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन, एका वर्षात चाळीस हजार वीज मोटारी आणि एक वर्षात ४० हजार विहिरी खोदून दिल्याचे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, अतुल भातखळकर, वसंत गिते, सुनील बागूल, लक्ष्मण सावजी आदि व्यासपीठावर होते. प्रास्ताविक शहराध्यक्ष आमदार बाळसाहेब सानप यांनी केले. (प्रतिनिधी)