महाराष्ट्र संघाची बडोद्यावर 'अबकी बार चारसो पार' ने मात

By धनंजय रिसोडकर | Updated: January 26, 2025 17:08 IST2025-01-26T17:07:17+5:302025-01-26T17:08:19+5:30

तब्बल सात वर्षानंतर येथील अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्राने बडोद्याचा 429 धावांनी दणदणीत पराभव केला.

Maharashtra team defeats Baroda by Abki Baar Charso Par | महाराष्ट्र संघाची बडोद्यावर 'अबकी बार चारसो पार' ने मात

महाराष्ट्र संघाची बडोद्यावर 'अबकी बार चारसो पार' ने मात

नाशिक : तब्बल सात वर्षानंतर येथील अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्राने बडोद्याचा 429 धावांनी दणदणीत पराभव केला. सामनावीर म्हणून पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतकवीर ठरलेला सौरभ नवले याला गौरवण्यात आले. उपहारानंतर तासाभरातच बडोद्याच्या सर्व खेळाडूंना तंबूत पाठवत महाराष्ट्राचा खेळाडूंनी एकच जल्लोष केला.

महाराष्ट्राने कालच्या 7 बाद 464 धावसंख्येवर आपला दुसरा डाव घोषित केला. पहिल्या डावाची आघाडी धरून महाराष्ट्राने बडोद्यासमोर विजयासाठी तब्बल 616 धावांचे आव्हान दिले. त्यामुळे सकाळीच बडोद्याच्या सलामीवीरांनी बडोद्याच्या डावाची सुरुवात केली. सलामीवीर शिवालीक शर्मा हा झटपट बाद झाला त्यावेळी 1 बाद 16 अशी झाली होती. त्यानंतर ठराविक क्रमाने बडोद्याचे गडी बाद होत गेले.

नाशिकचा लोकल बाॅय अर्थात रामकृष्ण घोष याने पुन्हा एकदा गोलंदाजीची चमक दाखवत दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. विशेषत्वे बडोद्याचा कर्णधार कृणाल पांड्या याला दुसऱ्या डावातदेखील त्यानेच तंबूची वाट धरायला  लावली. रामकृष्णने 16 धावात 2 गडी बाद केले. बडोदाचे फलंदाज एकापाठोपाठ बाद होत गेले तोच तसा महाराष्ट्राचा विजय समीप येत गेला. महाराष्ट्राच्या या विजयाने बडोद्याच्या संघ गुणतालिकेत फरक पडला असून जम्मू काश्मीर प्रथम स्थानावर पोहोचले आहे. 

सेल्फीसह ऑटोग्राफवाल्यांची निराशा

 कुणाल पांड्या व ऋतुराज गायकवाड यांच्याबरोबर सेल्फी काढता यावी किंवा किमान एक सही तरी मिळावी या अपेक्षेने नाशिककर क्रिकेटप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सामना संपल्यानंतरही जवळजवळ दोन तास या  खेळाडूंची वाट पहाण्यासाठी थांबले होते. अनेकांनी प्रतीक्षा करूनही त्यांना कुणाल पांड्या व ऋतुराज गायकवाड यांना भेटता न आल्यामुळे नाराज होऊन परतावे लागले.

गोलंदाजांच्या क्षमतेवर होता विश्वास

पत्रकारांशी झालेल्या संवादात महाराष्ट्राचा कर्णधार  ऋतुराज गायकवाड याने विजयाबद्दल आनंद व्यक्त करत पुढील सामन्यातही विजयी घोडदौड सुरूच ठेवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच बडोद्याच्या संपूर्ण संघाला दिवसभरात आमचे गोलंदाज नक्कीच बाद करतील हा विश्वास होता. त्यामुळेच तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत आम्ही खेळून काढत डाव घोषित करण्याची घाई केली नाही. नाशिकचे वातावरण आणि प्रेक्षकांचा पाठिंबा देखील खूप चांगला लाभला. त्यामुळे नाशिकला खेळताना आनंद मिळाला असल्याचे ऋतुराज गायकवाड याने नमूद केले.

Web Title: Maharashtra team defeats Baroda by Abki Baar Charso Par

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.