स्थायीच्या राजीनाम्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कलह
By Admin | Updated: July 14, 2016 00:59 IST2016-07-14T00:57:28+5:302016-07-14T00:59:04+5:30
राजकारण : पुढील बुधवारी दोन नव्या सदस्यांची नियुक्ती

स्थायीच्या राजीनाम्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कलह
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदाचा वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या मनसेच्या सुरेखा भोसले आणि मेघा साळवे या दोन सदस्यांचे राजीनामे पक्षाने मंजूर केले असून, त्यावरून सध्या पक्षात जुंपली आहे. यशवंत निकुळे यांना मात्र अभय देण्यात आल्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, स्थायी समितीच्या या दोन रिक्त जागांसाठी येत्या बुधवारी (दि.२०) महासभेत नियुक्तप्रक्रिया राबवली जाणार आहे.
महापालिकेच्या महत्त्वपूर्ण स्थायी समितीसाठी सर्वच पक्षात रस्सीखेच असते. त्यातच आता निवडणुकीऐवजी पक्षीय तौलनिक बळानुसार नियुक्तीची पद्धत असल्याने राजकीय पक्ष निर्धास्त झाले असून, दोन वर्षांसाठी सदस्यांचा कालावधी असताना आता या समितीवर प्रत्येकाला संधी मिळावी, यासाठी दरवर्षीच पक्षाच्या सदस्यांचे राजीनामे घेऊन अन्य सदस्यांना संधी दिली जाते. स्थायी समितीवर असलेल्या मनसेच्या सुरेखा भोसले, मेघा साळवे आणि यशवंत निकुळे या तीन सदस्यांचा वर्षभराचा कालावधी फेबु्रवारी महिन्यात संपल्यानंतर अन्य सदस्याला संधी देण्यासाठी त्यांचे राजीनामे पक्षाने घेऊन ठेवले मात्र सभापतिपदाची निवडणूक झाल्यानंतर हे राजीनामे स्वीकृत करण्याचे ठरले होते. परंतु आता पक्षाने राजीनामे मंजूर करू नये, यासाठी सर्वच सदस्य इच्छुक असताना पक्षाने सुरेखा भोसले आणि मेघा साळवे यांचे राजीनामे मंजूर केले असून त्यांच्या जागी पक्षाच्या अन्य सदस्यांना संधी मिळावी, यासाठी येत्या २० जुलै रोजी महासभेत नियुक्ती केली जाण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मनसेत अंतर्गत वाद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. कारण, तीनपैकी दोन जणांचे राजीनामे घेण्यात आले असून कोणाचे राजीनामे मंजूर झाले हे संबंधितांना अद्याप ज्ञात नाही. महापौर कार्यालयाकडून मात्र भोसले आणि साळवे यांचे राजीनामे मंजूर करण्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)