जानेवारीत भरणार ‘महापेक्स-२०१६’
By Admin | Updated: December 7, 2015 22:27 IST2015-12-07T22:26:42+5:302015-12-07T22:27:48+5:30
छंदांचा राजा : टपाल तिकिटांच्या ४०० फ्रेम होणार प्रदर्शित

जानेवारीत भरणार ‘महापेक्स-२०१६’
नाशिक : जागतिक पातळीवर टपाल तिकिटांचा छंद अनेकांनी जोपासला आहे. अशा लोकप्रिय छंद असलेल्या देशभरातील संग्रहकर्त्यांचा महाकुंभ अर्थात ‘महापेक्स-२०१६’ राज्यस्तरीय दोन दिवसीय प्रदर्शन येत्या जानेवारी महिन्यात शहरात होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल अशोक कुमार दास यांनी केली.
पुणे महामार्गावरील उपनगरमधील टपाल भांडारगृहाच्या आवारात जानेवारी महिन्याच्या १६ तारखेपासून ‘महापेक्स-२०१६’ला प्रारंभ होणार आहे. सदर प्रदर्शन दोन दिवस सुरू राहणार असून, यामध्ये भारतभरातून टपाल तिकिटांचे संग्रहकर्ते सहभागी होणार आहेत. तसेच महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांमधील संग्रहकर्त्यांसाठी वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.
सुमारे शंभर ते दीडशे संग्रहकर्ता प्रदर्शनात सहभागी होणार असल्याचे दास यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी औरंगाबाद विभागाचे जनरल पोस्ट मास्तर प्रणव कुमार उपस्थित होते.
टपाल तिकिटांना कागदपत्रांचे राजदूत असेही म्हटले जाते. या टपाल तिकिटांविषयीची माहिती व जागरूकता व्हावी, तसेच तरुण पिढीमध्ये टपाल तिकिटांद्वारे देशाची संस्कृती उलगडली जावी, या उद्देशाने नाशिक शहरात सुमारे सतरा वर्षानंतर ‘महापेक्स-२०१६’ प्रदर्शन आयोजित क रण्यात येणार असल्याचे दास यांनी यावेळी बोलताना सांगितले.
विद्यार्थ्यांना मोफत सहभागाची संधी
टपाल तिकिटांचा संग्रह करणार्या शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘महापेक्स-२0१६’ प्रदर्शनात नि:शुल्क सहभागाची संधी आहे. युवा गट व बाह्य स्पर्धात्मक गटासाठी प्रवेश शुल्क माफ करण्यात आले आहे. अन्य गटासाठी प्रदर्शनामध्ये सहभाग घेण्यासाठी प्रतिफ्रेम रुपये शंभर याप्रमाणे सहभाग शुल्क भरावे लागणार आहे. प्रवेशासाठीचे नमुना अर्ज शहरातील मुख्य टपाल कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.