महंत म्हणतात ‘हो गया’ : प्रशासनाची दोन दिवस मुदत
By Admin | Updated: July 7, 2015 01:07 IST2015-07-07T01:06:49+5:302015-07-07T01:07:24+5:30
जागावाटपात संदिग्धता

महंत म्हणतात ‘हो गया’ : प्रशासनाची दोन दिवस मुदत
नाशिक : तपोवनात साकारणाऱ्या साधुग्राममध्ये महापालिकेने विकसित केलेल्या प्लॉटचे आखाडे, खालशांना वाटप करण्यासाठी सोमवारी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत जागावाटपाचा मुद्दा बाजूला राहून साधू-महंतांच्या मागण्यांवरच चर्चा होऊन संपुष्टात आली. महंत ग्यानदास यांनी बैठकीनंतर ‘बटवारा हो गया’ असे जाहीर केले, तर प्रशासनाने जागावाटपाबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्याचे सांगून यासंदर्भातील संदिग्धता कायम ठेवली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे बोलाविण्यात आलेल्या या बैठकीस तीन आखाडे, १८ अनी आखाडे व खालसा प्रमुखांच्या उपस्थितीत प्रारंभी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांनी आजवर केलेल्या कामांचे सादरीकरण केले. तपोवनात साकारण्यात येणाऱ्या साधुग्राममध्ये महापालिकेने १५३७ प्लॉट विकसित केले असून, काही सेक्टरचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही, असे असतानाही प्रशासनाने गेल्याच आठवड्यात सर्व आखाडे, खालशांच्या प्रमुखांना पत्र पाठवून जागावाटपाबाबत सोमवारी बैठक घेण्यात येत असल्याचे कळविले होते. त्यानुसार सकाळी अकरा वाजेपासूनच साधू-महंतांनी गर्दी केली होती. प्रत्यक्षात या बैठकीत जागावाटपाचा काहीच मुद्दा उपस्थित होऊ शकला नाही, किंबहुना प्रशासनानेदेखील यासंदर्भात अवाक्षरही उच्चारला नाही.
महापालिकेने विकसित केलेल्या प्लॉटबाबत रविवारी महंत ग्यानदास यांनी साधुग्रामची पाहणी करून तीव्र नापसंती व्यक्त केली होती. एक समान विकसित प्लॉट काही उपयोगाचे नसल्याचे सांगून त्यांनी फेर प्लॉट विकसित करण्याची मागणी केली व प्रशासनानेही ते मान्य केले होते. त्यामुळे प्लॉटची फेररचना करण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)