महंत नरेंद्रगिरी : अखिल भारतीय आखाडा परिषदेचा मीच अध्यक्ष
By Admin | Updated: July 13, 2015 00:06 IST2015-07-12T23:51:11+5:302015-07-13T00:06:48+5:30
ग्यानदास यांच्याकडून दिशाभूल

महंत नरेंद्रगिरी : अखिल भारतीय आखाडा परिषदेचा मीच अध्यक्ष
त्र्यंबकेश्वर : नाशिककर व प्रशासनाचे अधिकारी महंत ग्यानदास यांच्या बहकाव्यात येत असून, ग्यानदास आखाडा परिषदेचा अध्यक्ष नाहीत़ असे मी त्रिवार सांगतो, ते सर्वांचीच दिशाभूल करीत आहेत, असे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष तथा निरंजनी आखाड्याचे महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या संदर्भात महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी सांगितले उज्जैन येथे आखाडा परिषदेची बैठक होऊन आपली एकमताने अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती १४ मार्च २०१५ रोजी झाली आहे. ग्यानदासजी हे कोर्टाची आॅर्डर दाखवितात पण कोर्टाची आॅर्डर ही अलाहाबाद पुरती होती. अलाहाबादचा कुंभ संपला. त्यांची आॅर्डरदेखील मुदतबाह्य झाली़
यावेळी महामंत्री तथा महंत हरिगिरी यांनी मध्येच हस्तक्षेप करून म्हणाले, त्यांना अध्यक्षपदाचा मोह सुटत नाही. नव्हे, त्यांचे अंतर्मनच ‘मी अध्यक्ष राहिलो नाही’ हे मानायला तयार नाही. त्यामुळेच ते स्वत:ला स्वयंघोषित अध्यक्ष मानतात. या फक्त तीन अर्ज वगळून बाकी सर्व आखाडे यांची बैठक उज्जैन, क्षिप्रा घाट येथील जुना आखाड्यात झाली होती. तसा प्रस्ताव व त्यावरील उपस्थितांची नावे महंत प्रेमगिरी महाराज यांनी दाखविला.
दरम्यान, याच बैठकीत त्र्यंबकनगर पालिकेत काही दिवसांपूर्वी श्रीकुशावर्तावर देवस्थानने आपली मालकी दाखवून तेथील विश्वस्तांनी काही वक्तव्ये केली. ही बाब साधुमहंतांच्या बैठकीत उपस्थित केली, याबाबत महंत हरिगिरी, नरेंद्रगिरी यांनी या वक्तव्याची खिल्ली उडविली. ते म्हणाले, असे वक्तव्य करणे चुकीचे असून, आम्ही येथे पारंपरिकरीत्या स्नान करीत असून कोणीही मालकी सांगितली नाही. त्यामुळे कोणी कुठे बसावे, किंवा स्नानाला जावे हे सांगणे, ही बाब दुर्दैवी आहे असे मत व्यक्त करून नाराजी व्यक्त केली. त्र्यंबकला प्रत्येक आखाड्यांच्या साध्वी असून, जुन्या आखाड्याची, भोजनाची आदि आम्ही स्वतंत्र व्यवस्था करतो. आम्ही जागोजागी कधीच भांडत नसतो. आमच्या प्रत्येक आखाड्याकडे भरपूर जमीन आहे. तसेच नाशिक येथे आलेल्या साध्वी भवंतादेवी यांनी स्वतंत्र स्नानाच्या वेळेची मागणी केली आहे. तथापि आमच्या वेळा निश्चित व पारंपरिकरीत्या सुरू आहेत. त्यावेळेत त्यांना वेळ देणेच शक्य नाही. याशिवाय त्या कोणत्या आखाड्याशी संबंधित नाही, असे म्हणून त्यांचा प्रश्न निकाली काढला. त्यानंतर पुनश्च ग्यानदासजींच्या विषयावर ते म्हणाले, अध्यक्ष म्हणून असताना किंवा सध्याही त्यांनी एकही बैठक बोलविली नाही. ते बैठक का लावू शकले नाही? सध्या नाशिकमध्ये असलेल्या त्या तिन्ही आखाड्यांचे महंत तरी ते आहेत का? ते ज्या आखाड्याशी संबंधित आहेत त्या निर्वाणी आणि आखाड्याचे श्रीमहंत धरमदास महाराज आहेत. दिगंबर अनी आखाड्याचे महंत श्रीराम किशोरदास महाराज तर निर्मीही अनीचे श्री महंत राजेंद्रदास आहेत. तर मग त्यांचे पद कोणते? असे सवाल उपस्थित करून या विषयावर त्यांना बोलण्याचा हक्क नाही, असे ठणकावले. तसेच प्रशासनाला रेतीबद्दल मागणी केली यावर जिल्हाधिकारी यांनी आम्ही आखाड्यातील कामांना रेती कमी पडू दिली नाही, सर्व सिंहस्थ कामे वेळेवर पूर्ण करून घेऊ, असे सांगून वाळूच्या वादावर पडदा पडला. तसेच नाशिक कुंभमेळा असे लिहिले-बोलले जाते. त्याऐवजी त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा असे संबोधले जावे, अशीही जोरदार मागणी केली. यावेळी महंत सागरानंद सरस्वती, महंत नरेंद्रगिरी महंत हरिगिरी, महंत प्रेमगिरी, महंत रघुमुनी, महंत हिंदूजी महाराज, महंत आशिशगिरी, महंत शंकरानंद सरस्वती, महंत रमेशगिरी, महंत विचारदास, महंत सतीशगिरी, महंत गणेशानंद सरस्वती आदी उपस्थित होते. (वार्ताहर)