महाकवी कालिदास कलामंदिर लवकरच खुले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:36 AM2018-03-28T00:36:52+5:302018-03-28T00:36:52+5:30
गेल्या तीस वर्षांपासून शहराचे सांस्कृतिक केंद्र बनलेले महाकवी कालिदास कलामंदिर आता लवकरच नव्या रूपात नाशिककरांसाठी खुले होणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, संबंधित कंत्राटदाराला ३१ मार्चपर्यंतची डेडलाइन देण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कालिदास पुन्हा नाशिककरांच्या सेवेत रजू होण्याची शक्यता आहे. याशिवाय, महात्मा फुले कलादालनाचेही काम प्रगतिपथावर आहे.
नाशिक : गेल्या तीस वर्षांपासून शहराचे सांस्कृतिक केंद्र बनलेले महाकवी कालिदास कलामंदिर आता लवकरच नव्या रूपात नाशिककरांसाठी खुले होणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, संबंधित कंत्राटदाराला ३१ मार्चपर्यंतची डेडलाइन देण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कालिदास पुन्हा नाशिककरांच्या सेवेत रजू होण्याची शक्यता आहे. याशिवाय, महात्मा फुले कलादालनाचेही काम प्रगतिपथावर आहे. नगरपालिका काळातील खुले लोकमान्य नाट्यगृह असलेल्या जागेत महापालिकेने १९८७ मध्ये महाकवी कालिदास कलामंदिराची उभारणी केली होती. त्यावेळी किर्लोस्कर कन्सल्टंटने कालिदास कलामंदिराच्या बांधकामाची जबाबदारी पेलली होती. ३० मार्च १९८७ रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तत्कालीन अध्यक्ष व नाट्य दिग्दर्शक विजया मेहता यांच्या उपस्थितीत कालिदास कलामंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडला होता. कालिदास कलामंदिराच्या उभारणीनंतर किरकोळ डागडुजीची कामे होत राहिली. बाळासाहेब सानप यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीत खुर्च्या नव्याने बसविण्यात आल्या. परंतु, कालिदास कलामंदिराचा मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास ३० वर्षांनंतर प्रथमच हाती घेण्यात आला. कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करताना कालिदास कलामंदिरामधील फ्लोरिंग बदलण्यात आले आहे. नव्याने खुर्च्या बसविण्यात येणार आहेत. कालिदास कलामंदिराच्या छतावर असलेले सीमेंटचे पत्रे काढून त्याठिकाणी फॅक्टरीमेड फायबरचे पत्रे टाकण्यात आले आहेत याशिवाय, अत्याधुनिक ध्वनिव्यवस्था बसविण्याची कार्यवाही सुरू असून, अॅकॉस्टिकचेही काम जवळपास आटोपले आहे. विद्युत व्यवस्था, अग्निरोध यंत्रणा अद्ययावत केली जात आहे. कालिदास कलामंदिराची पूर्ण रंगरंगोटी करण्याबरोबरच रंगमंचाची सुधारणा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, स्वच्छतागृहाची संख्या वाढविण्यात येत आहे.
रसिकांची गैरसोय
जुलै २०१७ पासून कालिदास कलामंदिर नूतनीकरणासाठी बंद असल्याने त्याचा सारा ताण सार्वजनिक वाचनालयाच्या प. सा. नाट्यगृहावर येऊन पडला आहे. परंतु, कालिदास बंद असल्यामुळे गेल्या आठ महिन्यांत दर्जेदार नाटकांचे प्रयोग नाशिकला होऊ शकलेले नाही. त्यामुळे नाशिकच्या नाट्यरसिकांना मोठीच गैरसोय सहन करावी लागत आहे. स्मार्ट सिटी कंपनीने कंत्राटदाराला मार्च २०१८ पर्यंत मुदत दिलेली होती. त्यानुसार काम युद्धपातळी सुरू आहे. एप्रिल महिन्यात काम अंतिम होऊन मे महिन्यात जंगी उद्घाटन सोहळा होण्याची शक्यता आहे.
नाशिकची सांस्कृतिक भुक भागविणारे कालिदास कलामंदिर नव्या रुपात नाशिककरांना अधिक आनंद देणारे ठरणार असले तरी कलामंदिराचे सौदर्य ायम टिकावे यासाठी काही कार्यक्रमांना कलामंदिर देण्याबाबतचे निकष कठोर करणे अपेक्षित आहे. शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कालिदास दिल्याने खुर्च्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शाळांचे कार्यक्रम तसेच राजकीय पक्षांचे मेळावे यांना कालिदास भाड्याने देतांना नियम निकष ठरविणे महत्वाचे ठरणार आहे. त्याबाबत महापालिकेने निर्णय घेणे अपेक्षित आहे.