महाभारताचे झाले दैवीकरण
By Admin | Updated: July 17, 2017 00:15 IST2017-07-17T00:14:57+5:302017-07-17T00:15:14+5:30
नाशिक : रामायण-महाभारत पुराण किंवा महापुराण नसून उत्तम दर्जाचे ऐतिहासिक असे महाकाव्य आहे. हिंदू समाजापुढे कीर्तनकार व प्रवचनकारांनी या महाकाव्यामधील इतिहासाला कमी महत्त्व देत दैवीकरण केले

महाभारताचे झाले दैवीकरण
विवेक घळसासी : हिरे स्मृती व्याख्यानमालेचा समारोप
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : रामायण-महाभारत पुराण किंवा महापुराण नसून उत्तम दर्जाचे ऐतिहासिक असे महाकाव्य आहे. मात्र दुर्दैवाने हिंदू समाजापुढे कीर्तनकार व प्रवचनकारांनी या महाकाव्यामधील इतिहासाला कमी महत्त्व देत दैवीकरण केले, अशी खंत विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केली. ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प घळसासी यांनी रविवारी (दि.१६) गुंफले. रावसाहेब थोरात सभागृहात सुरू असलेल्या तीनदिवसीय व्याख्यानमालेचा समारोप झाला. यावेळी घळसासी यांनी ‘महाभारत : इतिहास की महाकाव्य’ या विषयावर बोलताना सांगितले की, रामायण, महाभारत यांसारख्या महाकाव्यांवर या देशात मालिका दाखविल्या गेल्या. या मालिका केवळ हिंदू वसाहतींमध्ये अथवा भारतातच श्रद्धेने बघितल्या गेल्या, असे मुळीच नाही तर बिगर हिंदू वसाहतींसह बांगलादेश, पाकिस्तानमध्येही या मालिकांनी गारुड केले; मात्र मालिकांमधून या महाकाव्यांचा मनोरंजनाचा प्रयत्न अधिक झाला हे दुर्दैव आहे. दुरदर्शनवरील महाभारताच्या मालिका बघून प्रेक्षकांच्या मनावर तातकालीन परिणाम झाला होता. त्यानंतर मात्र याव्दारे झालेले प्रबोधन प्रेक्षक विसरूनच गेले असेही त्यांनी सांगितले.
प्रवचनकार व कीर्तनकारांनी या ऐतिहासिक महाकाव्याचे दैवीकरण करण्यावर अधिक भर दिल्याने त्याचा परिणाम समाजावर अत्यंत वाईट स्वरूपात झाला. यामुळे हिंदू समाजाच्या चेतना पूर्णपणे थंड झाल्या आणि कीर्तनकारांचे कीर्तन रंगले, प्रवचन खुलले आणि महाकाव्यामधील इतिहास मात्र गुदमरला याचा खेद वाटतो. परमेश्वरापेक्षा बिदागीवर लक्ष ठेवून परमार्थाचे धडे देणे म्हणजे एकप्रकारे व्यवसायच आहे. धार्मिक क्षेत्रात काम करताना बिदागीला कमी आणि परमेश्वराला अधिक महत्त्व दिले गेले पाहिजे; मात्र दुर्दैवाने तसे होताना अद्यापही दिसत नाही, असे घळसासी म्हणाले. यावेळी माजी आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सीमा हिरे, विजय कदम, राजेंद्र कलाल, प्रा. यशवंत पाटील, दौलतराव घुमरे, शिवाजी गांगुर्डे, योगेश हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.