साडेतीनशे शिक्षकांच्या नोकरीवर ‘गदा’
By Admin | Updated: September 23, 2015 22:59 IST2015-09-23T22:59:27+5:302015-09-23T22:59:57+5:30
आता शिक्षकांनाही द्यावी लागणार ‘सीईटी’

साडेतीनशे शिक्षकांच्या नोकरीवर ‘गदा’
नाशिक : राज्य शासनाने २०१२ नंतर खासगी व्यवस्थापनावरील कोणत्याही शिक्षकांना भरती करण्यास बंदी घातली होती; मात्र या बंदीनंतरच्या काळातही ‘मान्यतेच्या’ पळवाटा काढून भरती करण्यात आलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर येण्याची चिन्हे आहे. शासनाने यासंदर्भात राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांकडून २०१२ नंतर मान्यता दिलेल्या शिक्षकांची माहिती मागविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यापुढे शासकीय किंवा खसगी व्यवस्थापनावरील शिक्षकांची भरती करताना सर्वच शिक्षकांना भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षा (सीईटी) द्यावी लागणार आहे.
दरम्यान, जिल्ह्णातील २०१२ नंतर भरती करण्यात आलेल्या सुमारे ८० अधिक प्राथमिक तर माध्यमिकचे सुमारे २४५ शिक्षकांच्या नोकऱ्यांवर त्यामुळे गंडांतर येण्याची चिन्हे असून या शिक्षकांची आस्थापना त्यामुळे धोक्यात आली आहे.
जिल्ह्णात प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत २०१२ नंतर सुमारे ३९ शिक्षकांना नियुक्ती पत्र देण्यात आले असून यापैकी काही शिक्षकांना त्यांची आस्थापना असलेल्या संबंधित संस्थांकडून २०१२ पूर्वीच नियुक्तीचे आदेश देण्यात आल्याचे समजते; मात्र २०१२ नंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत या ३९ शिक्षकांना मान्यता आदेश देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
२०१२ नंतर नाशिक व मालेगाव महापालिका हद्दीच्या क्षेत्रातील सुमारे ४२ ते ४३ शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्याचे समजते. तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत सुमारे २४५ शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात राज्य शासनाने २०१२ नंतर भरती करण्यात आलेल्या सर्वच शिक्षकांची माहिती मागविली आहे. बंदी नंतरही भरती करण्यात आलेल्या अशा प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या नियुक्त्या त्यामुळे संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. या शिक्षकांच्या नोकऱ्यांवर त्यामुळे गंडांतर येण्याची शक्यता आहे. २१ आॅगस्ट २०१५ च्या शालेय शिक्षणाच्या परिपत्रकानुसार यापुढे राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांतील सर्व शिक्षकांच्या रिक्त जागा भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षा (सीईटी परीक्षा) मार्फत भरण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी के. आर. ए. ए. कृती कार्यक्रम निश्चित केला आहे. ही भरती करताना जाहिरातीद्वारे आॅनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहे. तसेच प्रश्नपत्रिका तयार करणे, लेखी परीक्षा घेणे, पेपर तपासणी, मुलाखती व निकाल जाहीर करणे असा भरतीसाठी कृती कार्यक्रम ठरवून दिला आहे. (प्रतिनिधी)