मनसेचे ‘वायफाय’ सेनेकडून हायजॅक!

By Admin | Updated: February 14, 2017 01:54 IST2017-02-14T01:54:01+5:302017-02-14T01:54:18+5:30

असाही वचननामा : निवडक योजना वगळता तेच ते

MAC's 'Wifi' to Hajak! | मनसेचे ‘वायफाय’ सेनेकडून हायजॅक!

मनसेचे ‘वायफाय’ सेनेकडून हायजॅक!

नाशिक : महापालिका निवडणुकीत साथ देणाऱ्या युवा वर्गासाठी वायफाय देण्याची घोषणा मनसेने केली खरी, परंतु घोषणांपलीकडे ती गेलीच नाही. आता मनसेने सोडलेला हा मुद्दा शिवसेनेने हाती घेतला आहे. या पक्षाच्या वचननाम्यात नाशिक शहरातील महत्त्वाचे चौक, रस्ते, बसस्टॉप वायफाय करण्याचे वचन देण्यात आले आहे. काही निवडक कल्पना वगळता त्या त्या विषयांचा समावेश वचननाम्यात करण्यात आला आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. त्यात वायफाय योजनेचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर नवीन काहीच होत नसल्याची टीका होत असताना राज ठाकरे यांनी गांभिर्याने लक्ष घातल्याचे पत्रकारांना सांगितले. त्याचवेळी त्यांनी नाशिक शहरात वायफाय सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याआधीच नाशिकच्या एका उद्योजकाने महापालिकेला आपल्याकडील बॅँडवीथ मोफत देऊन त्या आधारे शहराच्या काही भागात मोफत वायफाय देता येईल, अशी सूचना केली होती. मात्र, पालिकेने त्यात नंतर स्वारस्य घेतले नाही. आता युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी हाच मोफत वायफायचा मुद्दा सेनेने आपल्या वचननाम्यात दिला आहे.
नाशिकच्या कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रनगरी तसेच नाशिकरोड आणि गंगापूररोड येथे कलादालन आणि नाट्यमंदिर उभारणार असल्याचे शिवसेनेने म्हटले असले तरी नाशिकरोड येथे अगोदरच नाट्यगृहासाठी जागा असून, नाट्यगृह बांधण्यासाठी १८ कोटींच्या निविदा मागविण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. तर चित्रनगरी सुरू करण्याची घोषणा शिवसेनेचेच माजी मंत्री बबन घोलप यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीपासून आजवर अनेकदा केली आहे. परंतु त्यासाठी मनपा हद्दीबाहेरील जागा ताब्यात घेणे शक्य नसल्याने प्रशासनाने त्यार तसूभरही विचार केलेला नाही.
नाशिकचे नाव उज्ज्वल करणाऱ्यांंना मनपा कलावेतन देणार आणि कलाकारांसाठी आर्ट गॅलरी उभारणार या आणखी दोन नवीन कल्पना असून, त्यापैकी कलावंतांना मानधन ही शासनाची जबाबदारी आहे तर महापालिकेच्या मालकीचे महात्मा फुले कलादालन असून, त्याचे नूतनीकरण आजवर शिवसेना करू शकलेली नाही. परंतु नव्या दालनाची घोषणा करण्यात आली आहे. महापालिकेची बससेवा, न्यायालयातील प्रलंबित दाव्यांचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था, क्रीडा प्रबोधिनी, एसआरए हे सर्व विषय जुनेच असून, त्यात नावीन्य काहीच नाही.

Web Title: MAC's 'Wifi' to Hajak!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.