मुकणे प्रश्नी सेनेची उडी; विशेष महासभेची मागणी
By Admin | Updated: September 23, 2015 00:20 IST2015-09-23T00:19:40+5:302015-09-23T00:20:07+5:30
बोलविता धनी वेगळाच : महानगरप्रमुखांचा आरोप

मुकणे प्रश्नी सेनेची उडी; विशेष महासभेची मागणी
नाशिक : मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेसंबंधी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्याचा अल्टीमेटम न्यूनतम निविदाधारक एल अॅण्ड टी कंपनीने महापालिकेला दिल्यानंतर शिवसेनेनेही या प्रश्नी उडी घेत आपली विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे. सदर कंपनीच्या पत्रामागे बोलविता धनी वेगळाच असून कंपनीच्या दबावाला बळी न पडता या प्रश्नी विशेष महासभा घेऊन सखोल चर्चा घडविण्याची मागणी महानगरप्रमुख व सेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे.
मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने उठविल्यानंतर याबाबत येत्या ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा सदर प्रकल्प साकारणे परवडणार नसल्याचे पत्र एल अॅण्ड टी कंपनीने महापालिका आयुक्तांना दिले आहे. त्याबाबत शिवसेनेची भूमिका मांडताना अजय बोरस्ते यांनी सांगितले, कंपनीचे असे पत्र येणे आणि प्रशासनाने त्याबाबत तत्परता दाखविणे यापाठीमागे नेमका कोण नेम साधतो आहे, याची चौकशी झाली पाहिजे.
मुकणे प्रश्नी महापालिकेवर अतिरिक्त बोजा पडू नये, ही सेनेची प्रारंभापासूनची भूमिका आहे. निविदा प्रक्रियेनंतर अटी-शर्तींमध्ये झालेले बदल, जलशुद्धिकरण प्रकल्पाची कमी करण्यात आलेली क्षमता, पाईपच्या आकारमानातील बदल या साऱ्या बाबी संशयास्पद आहेत. त्याचा खुलासा होणे आवश्यक आहे. शासनानेही स्थगिती उठविताना महापालिकेवर कोणतीही आर्थिक तोशीस लागू नये, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सदर प्रस्तावावर विशेष महासभा बोलावून सखोल चर्चा घडणे अत्यावश्यक आहे. शिवसेना त्याबाबत महासभेत जाब विचारणार आहे. सत्ताधाऱ्यांनीही कुणाला पाठीशी घालू नये, असा इशाराही बोरस्ते यांनी दिला.