लकी ड्रॉचा मटका अन् महिलेला तीन तोळ्याचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:15+5:302021-09-21T04:16:15+5:30
या प्रकरणी दिंडोरी रोडवर राहणाऱ्या अनिता रामेश्वर पवार यांनी पंचवटी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पवार यांनी काल नेहमीप्रमाणे ...

लकी ड्रॉचा मटका अन् महिलेला तीन तोळ्याचा फटका
या प्रकरणी दिंडोरी रोडवर राहणाऱ्या अनिता रामेश्वर पवार यांनी पंचवटी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पवार यांनी काल नेहमीप्रमाणे दिंडोरी रोडवर फळांची हातगाडी लावली. त्यावेळी भामट्याने पवार यांच्याकडे येऊन तुम्ही कार्ड स्वॅप केले होते म्हणून तुम्हाला कंपनीकडून स्कीम मिळाली असून, ॲक्टिवा दुचाकी व डबल डोर फ्रीज मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्याकडील सोन्याच्या दागिन्यांच्या पावत्या जमा करा असे सांगितले. त्याच्या या आमिषाला बळी पडलेल्या पवार यांनी दागिन्यांच्या पावत्या घेण्यासाठी भामट्यासमवेत घर गाठले. मात्र दागिन्यांची पावती नसल्याचे सांगितल्यावर भामट्याने त्यांना त्यांच्या अंगावरचे दागिने काढून द्या मी वजन करून आणतो, असे सांगून पवार यांच्या मुलाचा मित्र शशिकांत उबाळे याला घेऊन निमाणी बसस्थानक परिसरात आणले. भामट्याने उबाळे यास एका जागेवर थांबण्यास सांगून झेरॉक्स काढण्याच्या बहाण्याने ॲक्टिवा दुचाकीसह सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले. विशेष म्हणजे पवार यांच्याकडे सोन्याचे दागिने कमी वजनाचे असल्याने त्यांनी शेजारी राहणाऱ्या अलका साळवे यांच्याकडून काही वेळासाठी दागिने घेतले होते, तेदेखील भामट्याने लांबविले आहेत.
बॉक्स=
सावधगिरी बाळगा
सध्या विविध कंपनीतून तुम्हाला लकी ड्रॉ लागला असे फोन करून किंवा व्हाॅट्सॲप फेसबुक मेसेंजर सोशल मीडियावर लिंक पाठवून फसवणूक केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी नंबरवरून फोन आला किंवा मेसेज आला, तर त्याकडे दुर्लक्ष करून आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही यासाठी सावधगिरी बाळगावी.
-डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक, पंचवटी