मखमलाबादला कमी दाबाने वीजपुरवठा
By Admin | Updated: October 2, 2015 23:47 IST2015-10-02T23:46:53+5:302015-10-02T23:47:22+5:30
नागरिक त्रस्त : वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष

मखमलाबादला कमी दाबाने वीजपुरवठा
पंचवटी : येथील मखमलाबाद गावठाण परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याबाबत वीज वितरण कंपनीकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मखमलाबाद गावठाण भागात वीज वितरण कंपनीचे विद्युत रोहित्र असून, त्यात बिघाड झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले. सध्या अर्ध्या गावात वीजपुरवठा सुरळित तर उर्वरित गावात कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना विजेची सोय असूनही अंधारात बसावे लागत आहे. मखमलाबाद गावठाणातील राजवाडा, कोळवाडा, तसेच काकड गल्ली व माळी गल्लीचा परिसर असून, विद्युत रोहित्रात बिघाड झाल्याने व त्यातच रोहित्र दुरुस्तीसाठी लागणारे साधन साहित्य वीज वितरण कंपनीकडे शिल्लक नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. सध्या कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने गावातील पीठ गिरणी तसेच कपडे इस्तरीचे दुकानेही बंद ठेवावी लागत आहेत. गेल्या आठवड्यात वीज वितरण कंपनीच्या विद्युत पोलवर दुरुस्तीचे काम करणारा प्रवीण पगारे नामक कर्मचारी शॉक लागून ठार झाल्याची घटना घडल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीवर ताशेरे ओढले होते कदाचित या प्रकारामुळेच वीज वितरण कंपनीचे कर्मचारी भयभीत झाल्याने ते मखमलाबाद गावात दुरुस्ती काम करण्यासाठी येण्यास टाळत असल्याचेही बोलले जात आहे.