कमी दाबाचा वीजपुरवठा
By Admin | Updated: September 27, 2016 00:34 IST2016-09-27T00:33:49+5:302016-09-27T00:34:24+5:30
शेतकरी संतप्त : सिंगल फेज योजना राबविण्याची मागणी

कमी दाबाचा वीजपुरवठा
द्याने : वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या असंतुलित व कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना आपले वीजपंप सलग चालविता येत नाही तसेच पंप जळण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. काही भागात सिंगलफेज योजना कार्यान्वित न झाल्यामुळे शेतशिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. परिसरात सिंगल फेज योजना त्वरित राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.
वीज वितरण कंपनीने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे विजेचा पुरवठा होत नसून, विद्युतवाहक तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन विद्युत जणित्रावरील डी.ओ. जाणे, फ्यूज ना दुरुस्त होणे, डी.पी जळणे अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत. स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारची तत्पर यंत्रणा नसल्यामुळे लोडशेडिंग संपल्यावरच संबंधित देखभाल व दुरूस्तीचे काम होते किंवा त्या कामाला दोन ते तीन दिवस विलंब होतो. यात सुधारणा होणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, अशोक सावंत, नामदेव सावंत, संजय भामरे, दिनेश सावळा, बापू जगताप मधुकर कापडणीस, गिरीश भामरे, नितीन काकडे, सम्राट काकडे, शशिकांत कोर, योगेश बोरसे,
विजय कोर, सुनील सोनवणे, योगेश मोरे, रविकांत कोर, योगेश पगार, नितीन मोरे, रोहिदास जाधव, विशाल मोरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
वीजजोडणी तत्काळ देण्याची मागणी
तालुक्यातील अनेक गावांमध्ये ओव्हरलोड विद्युत जनित्र आहेत. ते अण्डरलोड करावेत. वितरण कंपनीच्या ‘मागेल त्याला वीजजोडणी’ या ब्रीदवाक्याप्रमाणे कंपनीने वंचित शेतकऱ्यांना तत्काळ वीजजोडणी देऊन दिलासा द्यावा. मुल्हेर सबस्टेशनच्या लोडशेडिंग वेळापत्रकातील बदलामुळे मजुरांना पिण्याचे पाणी भरण्यासाठी सकाळी ११ वाजेपर्यंत घरी थांबावे लागते. त्यामुळे रोजगार बुडून परिणामी त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर पूर्वीचेच वेळापत्रक ठेवावे, अशा उपरोक्त मागण्यांचे निवेदन वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता चंद्रसिंग इंगळे यांना देण्यात आले.