कांदे, टमाट्याला नीचांकी भाव

By Admin | Updated: January 11, 2017 00:05 IST2017-01-11T00:04:57+5:302017-01-11T00:05:35+5:30

बळीराजा हतबल : वाहतूक खर्चही निघत नसल्याने संकटात

Low onion, tomatoes | कांदे, टमाट्याला नीचांकी भाव

कांदे, टमाट्याला नीचांकी भाव

बेलगाव कुऱ्हे : नोटाबंदी आणि कॅशलेसमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली असतानाच टमाटा व कांद्यानेही शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने बळीराजाचे गणित बिघडले असून, शासकीय धोरणांमुळे शेतकरी हतबल झाला आहे.
बळीराजा शेतीत घाम गाळून स्वकर्तृत्व व कौशल्याच्या बळावर मुबलक उत्पादन मिळवतो. मात्र त्यातून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याने त्याच्या नशिबी वणवण येते. इगतपुरी तालुक्यात चक्क ४ रुपये किलोच्या भावाने शेतकऱ्यांना कांदे विकावे लागत आहेत. मातीमोल भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे कांदे शेतातच सडत आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक स्रोत असणारे पीक म्हणजे कांदे. मात्र सध्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने बळीराजाचे आर्थिक गणित बिघडले असून, शासकीय धोरणांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. इगतपुरीच्या घोटी बाजार समितीत विक्र ीसाठी आलेले कांद्याचे दोनशे पोते आणि जेमतेम चार रुपये किलो भावाने विकला गेला. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने बळीराजाचे आर्थिक गणित कोलमडले असून, शासकीय धोरणांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. राज्य शासनाने आडतमुक्ती करून शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापाऱ्यांनी संघटित होऊन भाव वाढणार नाहीत याची काळजी घेतली. यामध्ये सर्वाधिक झळ कांदा पिकाला बसली. सध्यपरिस्थितीत कांद्याच्या भावातील घसरणीत वाढ झाली आहे. सध्या एक किलो टमाट्याला चार रुपये भाव मिळत आहे.
या भावात कांदा मार्केटला पाठवण्याचा वाहतूक खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. मागील चार ते पाच महिने कांद्याचे भाव कमी राहिल्याने पुढील काळात चांगला भाव मिळेल या अंदाजाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली. सध्या मोठ्या प्रमाणावर कांदे विक्रीसाठी तयार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या दरातील घसरण सुरू असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. सध्या मिळत असलेल्या भावात वाहतूक खर्चही भागत नसल्याने शेतकऱ्यांना आहे त्या स्थितीत कांदा सोडून द्यावा लागत आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान सहन करण्याची वेळ आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यंदाच्या हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली. त्यावरच बहुतांशी शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र पंधरवड्यापासून भाजीपाला कवडीमोल झाल्याने शेतकऱ्यांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. जेमतेम पाण्याच्या भरवशावर तालुक्यातील गोंदे दुमाला येथील शेतकऱ्यांनी मोठ्या धाडसाने कांद्याचे पीक घेतले होते. भाजीपाला नियमनमुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. पूर्वी शेतकऱ्यांनी बाजारात आणलेल्या शेतमालावर व्यापारी ६ टक्के आडत कापून घेत असत. तरीही शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडत होते. मात्र, आता खर्चही फिटत नाही त्यामुळे शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. कांदे उत्पादनासाठी घ्यावे लागणारे परिश्रम पाहिल्यास बाजारात मिळणारा भाव नगण्य आहे. प्रतिकिलो कांद्याला चार रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे परिश्रम मातीमोल ठरत आहे. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने खरेदीदारांकडून कमी भावाने कांद्याची उचल केली जात आहे. बहरात आलेले पीक अधिक दिवस शेतात ठेवल्यास त्याची नासाडी होत आहे. दुसरीकडे भाव मिळत नसल्याने तोडणीविना शेतकऱ्यांसमोर पर्याय दिसेनासा झाला आहे. अशा कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कमी भावाने कांद्याची विक्री केल्याविना दुसरा पर्याय नाही.
आधीच हतबल असलेल्या शेतकऱ्यांना भाजीपाल्याचे घसरलेले भाव आर्थिक संकटात लोटत आहेत. शासन शेतकऱ्यांच्या दु:खाकडे
कधी लक्ष देणार, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
भावात सतत घसरण सुरू असून शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा सडून चालला आहे. शेतात काबाडकष्ट करून सर्व जनतेची पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा शासनाने समजून घेऊन चांगला बाजारभाव मिळवून द्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Web Title: Low onion, tomatoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.