कमी उंचीची झाडे पालिकेकडून रिजेक्ट

By Admin | Updated: July 14, 2016 00:53 IST2016-07-14T00:50:27+5:302016-07-14T00:53:21+5:30

ठेकेदारांना झटका : पंधरा फूट उंचीचीच झाडे लावण्यावर कटाक्ष

Low-height plants rejection from the plants | कमी उंचीची झाडे पालिकेकडून रिजेक्ट

कमी उंचीची झाडे पालिकेकडून रिजेक्ट

 नाशिक : शहरात १५ फूट झाड लावण्यासाठी पालिकेने ठेकेदारांना आदेश दिल्यानंतर कमी उंचीची रोपे आणून पालिकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न उद्यान विभागाने हाणून पाडला. १२ फूट उंचीची झाडे पालिकेने उंची मोजून नाकारल्याने या ठेकेदारांना चाप बसला आहे.
महापालिकेने शहरात झटपट वाढणारी झाडे लावण्यासाठी यंदा वेगळाच प्रयोग केला आहे. यंदा १५ फूट उंचीची वाढलेली झाडे लावण्यात येणार आहे. यासंदर्भात फेब्रुवारी महिन्यातच ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. परंतु ठेकेदारांनी टाळाटाळ केली, आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश देताच, पावसाळा सुरू झाल्यानंतर झाडे लावण्याची तयारी ठेकेदारांनी तयारी केली आहे. त्यातील एका ठेकेदाराने पंधरा ऐवजी १० ते १५ फूट उंचीची झाडे आणून पालिकेच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापालिकेने झाडे घेऊन आलेला ट्रक तपासून घेण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले असून त्यांच्या उपस्थितीत झाडांची उंची मोजली जात आहे. एका ठेकेदाराने दोनशे झाडे आणली, त्यापैकी ७० झाडे ही दहा ते बारा फुट उंचीची असल्याने त्यावर तत्काळ आक्षेप घेऊन झाडे परत करण्यात आली. सध्या पंधरा फूट उंचीची झाडे १५०० ते १६०० रुपये प्रती झाड या दराने मिळतात. मात्र, संबंधित ठेकेदारांना केवळ साडेतीनशे रुपयांना मिळतात. त्यामुळे एका झाडामागे बाराशे ते तेराशे रुपये वाचवण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु उद्यान विभागाने तो हाणून पाडला. आता सर्व झाडांची उंची मोजून ती घेतली जात असून पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या समक्षच ती नियोजित ठिकाणी लावली जात आहेत. विशेष म्हणजे झाडांना कोणते खत घातले किंवा काय फवारणी केली, याबाबत संबंधित ठेकेदाराने व्हिडीओ शूटिंग करून ते पालिकेच्या सर्व्हरवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

Web Title: Low-height plants rejection from the plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.