A lot of thieves in Nashik district | नाशिक जिल्ह्यात टेहरेला चोरट्यांचा धुमाकूळ
नाशिक जिल्ह्यात टेहरेला चोरट्यांचा धुमाकूळ

ठळक मुद्देअंगणात व घराच्या गच्चीवर झोपडलेल्या नागरिकांच्या घरांना लक्ष्य केले

मालेगाव : शहरा लगतच्या टेहरे येथे दुचाकीवरुन आलेल्या चौघा चोरट्यांनी एकाच रात्री सात ठिकाणी धाडसी घरफोड्या करुन सुमारे आठ लाख रूपयांचे सोने व ८० हजारांची रोकड लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणांच्या सात घरांचा कडीकोंडा तोडून चोरी केल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी (दि.२०) रात्री दुचाकीवरुन आलेल्या चौघा चोरट्यांनी गावाची टेहळणी केली. अंगणात व घराच्या गच्चीवर झोपडलेल्या नागरिकांच्या घरांना लक्ष्य केले. विश्वास नानाजी शेवाळे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपटातील १८ तोळे ४ ग्रॅम वजनाचे सोने, पंकज भावराव शेवाळे यांचे ३ तोळे २ ग्रॅम सोने व ३५ हजार रूपये रोख, शिवाजी नारायण शेवाळे यांचे १ तोळे ८ ग्रॅम सोने व ५ भार चांदी तर अनिल मोतीराम शेवाळे यांनी मेडिकलच्या गल्ल्यात ठेवलेली ४५ हजार रूपयांची रोकड चोरून नेली आहे. डॉ. राजेंद्र अरविंद देवरे, अशोक माधवराव शेवाळे, शशिकांत संतोष पाटील यांच्या घरातही चोरट्यांनी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हा चोरीचा प्रकार मध्यरात्री उघडकीस आल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. गुरूवारी सकाळी अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, छावणीचे पोलीस निरीक्षक प्रविण वाडीले यांनी घटनास्थळांची पाहणी केली. दुपारी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात विश्वास शेवाळे यांच्या फिर्यादीवरुन दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 


Web Title: A lot of thieves in Nashik district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.