हरवलेला विद्यार्थी पालकांच्या स्वाधीन
By Admin | Updated: January 22, 2017 23:55 IST2017-01-22T23:55:16+5:302017-01-22T23:55:35+5:30
मनमाड : रेल्वे सुरक्षा बल कर्मचाऱ्यांची सतर्कता

हरवलेला विद्यार्थी पालकांच्या स्वाधीन
मनमाड : घाटकोपर येथून हरवलेला बारावीच्या वर्गातील विद्यार्थी भेदरलेल्या अवस्थेत मनमाड रेल्वेस्थानकावर फिरत असताना दिसून आला. रेसुब कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. शनिवारी रात्री मनमाड रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक तीनवर गस्तीवर असलेले रेसुब कर्मचारी सागर वर्मा यांना भेदरलेल्या अवस्थेतील एक अल्पवयीन विद्यार्थी फलाटावर एकटाच फिरत असल्याचे निदर्शनास आले. संशयास्पद वर्तन वाटल्याने त्यांनी त्या मुलाला रेसुब कार्यालयात आणले. रेसुब निरीक्षक के. डी. मोरे, उपनिरीक्षक पहेल यांनी या मुलाला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, गणेश सीताराम वीर (१७, रा. अंबिकानगर, कुर्ला) असे नाव असल्याचे त्याने सांगितले. या माहितीवरून रेसुब कर्मचाऱ्यांनी कुर्ला येथे त्याची बहीण गीता हिच्याशी संपर्क साधून मुलाबाबत माहिती दिली. माहिती मिळताच गीताने तत्काळ मनमाड गाठले. गणेशला पंचांच्या समक्ष घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आले. गणेश हा घाटकोपर येथील विद्यानिकेतन महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असून, १७ तारखेला तो हरवला असल्याची फिर्याद घाटकोपर येथील चिरागनगर पोलीस ठाण्यात दिली असल्याची माहिती गीता हिने दिली. १७ तारखेला कॉलेजमध्ये जात असताना मागून कुणीतरी खेचले होते. त्यानंतर मनमाडला कसा आलो हे सांगता येत नसल्याचे गणेश याने पोलिसांना सांगितले. मनमाड येथील रेसुब कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हरवलेल्या गणेशला त्याचे घर पुन्हा मिळाले. (वार्ताहर)