जळगाव जिल्ह्यासाठी पाणी सोडण्याचा डाव हाणून पाडू

By Admin | Updated: November 16, 2015 22:10 IST2015-11-16T22:09:18+5:302015-11-16T22:10:31+5:30

राष्ट्रवादी कॉँग्रेस : गिरणा-मोसम खोऱ्यावर अन्याय

Loss of water for Jalgaon district | जळगाव जिल्ह्यासाठी पाणी सोडण्याचा डाव हाणून पाडू

जळगाव जिल्ह्यासाठी पाणी सोडण्याचा डाव हाणून पाडू

मालेगाव : गिरणा-मोसम खोऱ्यात अत्यल्प पावसामुळे पिण्याबरोबर सिंचनाचा पाणीप्रश्न बिकट
बनला असून, कसमादेसह परिसरातील गावांना पाणीटंचाईची
झळ जाणवत आहे. मात्र या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत शासनाने जळगाव जिल्ह्यासाठी चणकापूर, पूनंद, केळझर व हरणबारी धरणांतून
गिरणा धरणात पाणी सोडण्याचा डाव रचला आहे. हा निर्णय कुठल्याही परिस्थितीत हाणून पाडला जाईल, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉँग्रेसने घेतली आहे. प्रसंगी जनआंदोलन उभारण्यात येईल
असाही इशारा पक्षातर्फे देण्यात शासनाला आला आहे.
पालकमंत्री व महसूलमंत्री जळगाव जिल्ह्यातील असल्यानेच हा निर्णय शासनातर्फे घेतला जाणार असला तरी कसमादे भागातील जनता हक्काचे एक थेंब पाणी गिरणा धरणात जाऊ देणार नाही. मुंबई येथील महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कार्यालयात गिरणा उपखोऱ्यातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली. त्यात चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांनी गिरणा धरणातून पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन करून समान पाणीवाटपाचे तत्त्व अंमलात आणावे, असे निवेदनाद्वारे सूचित केले होते. मात्र प्राधिकरणाने निवेदनास याचिका समजत यासंदर्भात मुंबईत सुनावणी आयोजित केली होती.
पालकमंत्री हे नाशिक जिल्ह्याचे असले तरी ते कसमादे भागातील पाणीटंचाईवर दुर्लक्ष करून जळगावचाच विचार करत असल्याचे या प्रकरणावरून सिद्ध झाले असल्याची टीका पवार यांनी केली.
गिरणा व मोसम खोऱ्यात १० वर्षांपासून पर्जन्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे सिंचन व पिण्याच्या पाणीप्रश्न दिवसागणिक बिकट होत चालला आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे जुलै २०१६ पर्यंत नियोजन झाले आहे. अशातच जर चणकापूर, केळझर, पूनंद व हरणभारी धरणांतून जळगावसाठी पाणी सोडल्यास कसमादे भागात पाणीटंचाईचे संकट उभे राहणार असल्याचे स्पष्ट आहे, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते डॉ. जयंत पवार यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Loss of water for Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.