अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:23 IST2021-05-05T04:23:42+5:302021-05-05T04:23:42+5:30
इगतपुरी तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून तालुक्याच्या विविध भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार गारपीट व वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या ...

अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
इगतपुरी तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून तालुक्याच्या विविध भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार गारपीट व वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या अनेक हेक्टर जमिनीवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुक्या जनावरांचा चारा, गवत वैरण, भाजीपाला, बागायत पिकांसह, वीटभट्टी व्यावसायिक, कापणीवर आलेल्या पिकांना त्याचा फटका बसला आहे. एकीकडे कोरोनाचे भयंकर संकट असताना तग धरून असलेल्या शेतकरी बांधवांना निसर्गही जगू देत नसल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत शासनसुद्धा दुर्लक्ष करत असल्याने बळीराजा अधिकच चिंताग्रस्त झाला आहे. महसूल यंत्रणेने कृषी विभागाच्या समन्वयाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोशी यांच्यासह माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, भाऊसाहेब कडभाने यांनी केली आहे. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे, टाकेद, घोटी, वैतरणा, वाडीवऱ्हे, गोंदे दुमाला, साकूर, नांदगाव बुद्रुक, गोंदे दुमाला, मुंढेगाव, सांजेगाव आदी गावांसह तालुक्यात सर्वच ठिकाणी चार दिवस जोरदार गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटात शेतकरी सापडला असताना शेतमालाला पाहिजे तसा भाव मिळत नाही. त्यात हे नैसर्गिक संकट ओढवले आहे. लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी अहवाल सादर करावा.
- सोमनाथ जोशी, सभापती, पंचायत समिती, इगतपुरी