एलईडी फिटिंग्ज लावण्यास स्थायीचाच खो
By Admin | Updated: September 26, 2014 00:56 IST2014-09-26T00:56:32+5:302014-09-26T00:56:53+5:30
एलईडी फिटिंग्ज लावण्यास स्थायीचाच खो

एलईडी फिटिंग्ज लावण्यास स्थायीचाच खो
नाशिक : निविदा काढण्यापासूनच वादग्रस्त असलेल्या एलईडी दिव्यांच्या सुमारे साडेसतराशे फिटिंग्ज अखेरीस शहरात दाखल झाल्या आहेत. तथापि, स्थायी समितीने या विलंबाबद्दल कायदेशीर कारवाईसाठी चाचपणी सुरू केली आणि त्यामुळे फिटिंग्ज बसविण्याचे काम रोखल्याने या फिटिंग्ज अक्षरश: पडून आहेत. आता विधानसभा निवडणुकीनंतरच एलईडीचा प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन वर्षांपासून एलईडी दिवे बसविण्याच्या ठेक्यातील घोळ गाजत आहे. एलईडी दिवे बसविल्यानंतर वीजबचत होणार असून, या बचतीच्या रकमेतून ठेकेदाराला गुंतवणूक केलेली रक्कम देण्याचा ठराव करण्यात आला होता; मात्र प्रशासनाने त्यात घोळ घालून डिफर्ड पेमेंट म्हणजेच प्रलंबित देयक योजनेचे स्वरूप दिले. त्यामुळे १३२ कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या ठेकेदार कंपनीस आठ वर्षांत २०२ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. सदर कंपनीशी करार केल्यानंतर त्यांनी वेळेत फिटिंग्ज न पाठविल्याने शहराच्या अनेक भागात अंधाराचे साम्राज्य असून, त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या दोनशे फिटिंग्ज कंपनी पाठविल्या त्यावरही समितीने संताप व्यक्त केला आणि ठेका रद्द करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार कारवाई झालेली नाही.
तथापि, ठेकेदाराने पालिकेकडे साडेसतराशे फिटिंग्ज पाठविल्या आहेत. संबंधित कंपनीला शहरातील तब्बल ७० हजार फिटिंग्ज बदलायच्या असताना, प्रत्यक्षात मात्र केवळ साडेसतराशे फिटिंग्ज पाठविण्यात आल्याने संपूर्ण शहरातील फिटिंग्ज केव्हा बदलणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)