मनपाच्या वृक्षलागवडीला पुन्हा ‘खो’

By Admin | Updated: July 17, 2016 00:18 IST2016-07-17T00:17:17+5:302016-07-17T00:18:34+5:30

ठेकेदारांची असमर्थता : फेरनिविदा काढण्याचा निर्णय

'Lose' again with Mandapla tree | मनपाच्या वृक्षलागवडीला पुन्हा ‘खो’

मनपाच्या वृक्षलागवडीला पुन्हा ‘खो’

नाशिक : महापालिकेने ठेकेदारांमार्फत शहरात सुमारे २१ हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला परंतु लागवडीसाठी १५ फुटावरील वृक्ष उपलब्ध होत नसल्याने ठेकेदारांनी असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे मनपाच्या वृक्षलागवडीला पुन्हा एकदा ‘खो’ बसला आहे. आता मुदतीत लागवड होत नसल्याबद्दल मनपाने संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा आणि फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने निविदा काढताना मात्र १५ फुटाची अट १० फुटावर आणली जाणार आहे.
महापालिकेने शहरात २१ हजार रोपांची लागवड करण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यानुसार, महापालिकेने पाच ठेकेदारांना वृक्षलागवडीबरोबरच एक आणि पाच वर्षे देखभाल-संवर्धनाचा ठेका दिला होता. सुरुवातीला कडक उन्हाळा आणि शहरात सुरू असलेली पाणीकपात या पार्श्वभूमीवर ठेकेदारांनी पावसाळ्यात वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्याची परवानगी मागितली होती. याशिवाय, १५ फुटावरील वृक्षरोप उपलब्ध होत नसल्याने अट शिथिल करण्याची मागणीही केली होती. परंतु मनपा आपल्या अटींवर ठाम राहिली. दरम्यान, महापालिकेने सदर ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिल्यानंतर ठेकेदारांनी वृक्षलागवडीची तयारी दर्शविली आणि कामास सुरुवातही केली. एका ठेकेदाराने गुजरातमधून १५ फुटावरील ७३ वृक्षरोप आणून लावले परंतु नंतर सुमारे २०० वृक्षांची उंची १५ फुटांपेक्षा कमी भरल्याने मनपाने त्यांना बाद ठरविले. १५ फुटांवरील वृक्ष उपलब्ध होत नसल्याने ठेकेदारांनी आता वृक्षलागवडीस असमर्थता दर्शविली असून काही ठेकेदारांनी चक्क त्यातून माघार घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वृक्षलागवडीचा कार्यक्रम पुन्हा एकदा रखडला आहे.

Web Title: 'Lose' again with Mandapla tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.