तोतया पोलिसांनी होमगार्डला फसविले
By Admin | Updated: September 13, 2016 01:26 IST2016-09-13T01:25:21+5:302016-09-13T01:26:02+5:30
नाशिकरोड येथील घटना : मोटारसायकल घेऊन केले पलायन

तोतया पोलिसांनी होमगार्डला फसविले
नाशिकरोड : आगरटाकळी येथे गणेशोत्सवाच्या बंदोबस्तावर असलेल्या होमगार्डलाच दोघा भामट्या तोतया पोलिसांनी आम्ही पोलीस आहोत असे सांगून नाशिकरोड रेल्वेस्थानकावर तपासणीसाठी घेऊन जात होमगार्डची मोटारसायकल पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशोत्सव बंदोबस्तासाठी आगरटाकळी दिवे बंगला चौफुलीवर होमगार्ड कैलास देवराम दराणे व सारिका घोडेकर यांना रविवारी सायंकाळी नेमले होते. रात्री ८.३० च्या सुमारास दोघे इसम त्यांच्याजवळ आले व त्यांनी दराणे याला आम्ही उपनगर पोलीस ठाण्यात डीबीमध्ये आहोत आताच नांदेड येथून बदली होऊन आलो आहोत. तू आम्हाला ओळखत नाही, असे सांगितले. त्या दोघांनी दराणे याला तुझी मोटारसायकल घे पेट्रोलिंग करत नाशिकरोड रेल्वेस्थानकावर तपासणी करून येऊ असे सांगितले. दराणेची मोटारसायकल एकजण चालविण्यास बसला. आगरटाकळी येथून रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी निघाल्यानंतर त्यांनी टाकळीरोडच्या तपोवन रस्ता कॉर्नरवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांजवळ गाडी थांबवून नमस्कार करत काही काळ त्यांच्याशी बोलले. त्यानंतर रस्त्यात समोरून येणारी पोलीस मोबाइल व्हॅनला हात देत आपण दोघे पोलीसच आहोत असे दराणे याला दाखवत रेल्वेस्थानकावर नेले. रेल्वेस्थानकात झोपलेल्या व बसलेल्या प्रवाशांना त्या दोघा भामट्यांनी दराणे याला सोबत ठेवत प्लॅटफॉर्म, रेल्वे तिकीट आहे का अशी विचारणा करत धमकावण्यास व पैसे मागण्यास सुरुवात केली. यावेळी त्या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याने त्या दोघांना तुम्ही कोण आहात, कुठून आलात अशी विचारणा करण्यास सुरुवात केली असता त्यांनी गर्दीचा फायदा घेत पलायन करून दराणे यांची मोटारसायकल पळवून नेली.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तोतया पोलीस म्हणून वावरणारे राजेश भास्कर शार्दुल, बंडू सोळंखे रा. आगर टाकळी या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शार्दुल याला उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.