दिवसाढवळ्या साडेतीन लाखांची लूट
By Admin | Updated: July 17, 2014 00:29 IST2014-07-16T23:19:43+5:302014-07-17T00:29:00+5:30
दिवसाढवळ्या साडेतीन लाखांची लूट

दिवसाढवळ्या साडेतीन लाखांची लूट
मालेगाव : शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या मोसमपूल भागातील मेडिकेअर रुग्णालयाजवळ दिवसाढवळ्या उभ्या कारमधून साडेतीन लाख रुपयांची बॅग पळविली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. प्रचंड रहदारी असलेल्या सटाणा रस्त्यावर दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकारामुळे शहरवासीयांचे धाबे दणाणले आहे.
ेयेथील मोसमपूल भागात तालुक्यातील टेहरे येथील साहेबराव दामू शेवाळे हे सकाळी बारा वाजेच्या सुमारास महिला बॅँक परिसरात एमएच ४१ व्ही ७०९९ या क्रमांकाची चारचाकी गाडी उभी करून युनियन बँकेत कामानिमित्त गेले होते. शेवाळे हे आपले काम संपवून सुमारे १० ते १५ मिनिटांत परत आले असता त्यांच्या गाडीच्या चालकाकडील बाजूची काच पुढील सीटवर पडलेली दिसली. त्यांनी गाडीत डोकावून पाहिले तर चालकाशेजारील सीटवर साडेतीन लाख रुपये असलेली बॅग नाहीशी झाल्याचे दिसले. बॅग न मिळाल्याने सदर घटनेची माहिती छावणी पोलीस ठाण्यात दिली. छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. एन. इंगळे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पहाणी करत तपासला सुरुवात केली.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बँका व रुग्णालये असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. त्यामुळे या भागात चोरांचा राबता असून पैसे, वाहन चोरीच्या घटना नेहमी घडत असतात. यात मागील दिवाळीत नामपूरच्या कांदा व्यापाऱ्याची गाडीच्या मागच्या सीटवरील बॅँकेतून २२ लाख रुपये काढून ठेवलेली बॅग चोरट्यांनी पळविली होती. या घटनेचा तपास लागलेला नाही. तसेच मागील महिन्यात इंडिका कारमधून पैशाची बॅग पळविण्यात आली होती. सदर व्यक्तीने पैसे मिळणार नसल्याने पोलिसांत तक्रार करण्याचे टाळले होते. तसेच या परिसरात भाजी घेण्यासाठी कायनेटीक गाडी उभी केली असता डिक्कीतून १ लाख २० रुपयांची चोरी करण्यात आली. यातील एकाही घटनेचा अद्याप उलगडा झालेला नाही.