रामकुंड परिसरातील मंदिरांचा ‘लूक’ बदलतोय
By Admin | Updated: July 11, 2015 23:06 IST2015-07-11T23:05:49+5:302015-07-11T23:06:43+5:30
रामकुंड परिसरातील मंदिरांचा ‘लूक’ बदलतोय

रामकुंड परिसरातील मंदिरांचा ‘लूक’ बदलतोय
नाशिक : रामकुंडावरील मंदिरे.. काही प्राचीन तर काही अलीकडेच बांधलेली. पैकी प्राचीन मंदिरांचा लूक बदलू लागला असून, काळ्याभोर रंगातील ही मंदिरे गोदाकाठचे सौंदर्य खुलवू लागली आहेत. ओरिसा आणि कर्नाटकमधील कारागिरांच्या मेहनतीने हे रूपडे पालटले आहे.
रामकुंड परिसरात अनेक मंदिरे आहेत. तसेच दुकानेही आहेत. एरव्ही हा भाग अतिक्रमण आणि अस्वच्छतेमुळे खराब दिसतो. परंतु कुंभमेळ्यामुळे सारेच चित्र बदलले आहेत. अतिक्रमणे हटविल्याने आणि गंगाघाटावरील भाजीबाजार हटल्याने याठिकाणी वेगळेच चित्र दिसत आहे. त्यातच आता या रंगविलेल्या आणि नव्या वाटणाऱ्या मंदिरांच्या सुशोभिकरणाची भर पडली आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मूलभूत सोयीसुविधांबरोबरच शहर सुशोभिकरणाचीही कामे करण्यात येत आहेत. रामकुंड परिसर हा तर सर्वाधिक लक्षवेधी भाग असून, त्याठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात सुशोभिकरणाची कामे सुरू आहेत. त्याअंतर्गतच मंदिरांचे खास मिश्रणाद्वारे रंग दिला जात आहे. पॉलिमर, सीमेंट आणि खडीची बारीक कच या माध्यमातून मिश्रण तयार करून त्याचे मंदिराला लेपन केले जात आहे. त्यामुळे रंग अधिकच खुलून दिसत आहे. रामकुंड परिसरातील सर्वच मंदिरांना अशा प्रकारचे पॉलिश करण्यात येत आहे. पैकी काही मंदिरांचे काम पूर्ण झाले आहे. रामकुंड परिसरात अनेक सुधारणांची कामे सुरू असून रामसेतूला संरक्षक कठडे बसविण्यात आले आहेत. तसेच अनेक मंदिरांवर रंगरंगोटी सुरू आहे. गांधीज्योतीला पॉलिश करण्याचे कामही सुरू आहे.
महापालिकेच्या वतीने अहल्यादेवी होळकर पूल ते टाळकुटे पूल आणि तेथून दसक पंचक भागापर्यंत रंगरंगोटी, तसेच दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले आहे. पैकी रामकुंड परिसरातील मंदिरांच्या रंगरंगोटीचे काम मूळ कर्नाटकचे रहिवासी असलेल्या रंगप्पा यांना देण्यात आले आहे. ओरिसा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कारागिरांना आणून मंदिरांचर रंंगरंगोटी सुरू आहे. चालू महिन्यात हे सर्व काम पूर्ण करणयात येणार आहे. (प्रतिनिधी)