रविवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:15 IST2021-05-22T04:15:22+5:302021-05-22T04:15:22+5:30
नाशिक: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रविवार (दि.२३) मध्यरात्रीपासून शिथिल ...

रविवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल
नाशिक: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रविवार (दि.२३) मध्यरात्रीपासून शिथिल करण्यात येणार आहे. मात्र, राज्य शासनाने लागू केलेले निर्बंध कायम राहाणार असून, त्याबाबतची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे.
जिल्ह्यातील कोराेनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने १२ ते २३ मे या कालावधीत लॉकडाऊन जाहीर केला होता. या लॉकडाऊनची मुदत रविवारी संपुष्टात येत असल्याने, लाॅकडाऊन शिथील करणार की अधिक वाढविला जाणार, याबाबत नाशिककरांचे पालकमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून होते. या प्रकरणी पालकमंत्र्यांनी मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. कोरोनाचा परिस्थितीचा आढावा घेतला. लॉकडाऊन लागू करण्यात आल्यापासून जिल्ह्यात त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, तर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेटही कमी होत आहे. त्यामुळे राज्याचे ‘ब्रेक द चेन’अंतर्गत असलेले निर्बंध जसेच्या तसे लागू करून जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्र व बाजार समित्या सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
उद्योग सुरू करताना करखान्यात येणाऱ्या प्रत्येक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी घेत असल्याचे हमीपत्र कंपन्यांना देणे बंधनकारक राहाणार आहे. कोरोना नियमांचे सर्व प्रकारचे पालन करूनच कामकाज सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. यापुढे जीवनावश्यक सेवा राज्य शासनाच्या निर्बंधानुसार सुरू राहतील. बाजार समित्यांचे कामकाजही नियमांचे पालन करून सुरू करता येणार आहे. त्यांनाही याबाबतचे हमीपत्र द्यावे लागणार आहे.
--इन्फो--
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, त्यासंदर्भातील सुविधा, बालकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना याबाबतचीही माहिती घेतली. बालकांसाठी शहर, तसेच जिल्ह्यात स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या. म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक ऑपरेशन थिएटर्स कामांना गती देण्यात यावी, ऑक्सिजन जनरेशनचे प्लॅन्ट लवकरात लवकर पूर्ण करावेत, अशा सूचनाही केल्या.
या बैठकीस दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, मालेगाव मनपाचे भालचंद्र गोसावी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरेाग्य अधिकारी डॉ.कपील अहेर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, वैद्यकीय अधिकारी डॉ.बापुसाहेब नागरगोजे हजर होते.