नाशिक : मुंबईचा महापौर युतीचा अथवा आघाडीचा झाला तरी नाशिक जिल्हा परिषदेत भगवा फडकवायचाच, या इर्षेने शिवसेनेचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. दुसरीकडे सत्ता टिकविण्यासाठी राष्ट्रवादीनेही धडपड सुरू केली आहे.ज्याचे संख्याबळ जास्त त्या पक्षाचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल, असे बोलले जात आहे. भाजपा आणि राष्ट्रवादीनेही त्यांचे संख्याबळ वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादीकडून मंदाकिनी बनकर यांचे पती माजी आमदार दिलीप बनकर यांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची घेतलेली भेट चर्चेत आहे. तर अमृता पवार यांनी मराठा विद्या प्रसारक संस्थेत सेवेत असलेले अपक्ष जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांना राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यपद स्वीकारण्यास भाग पाडून अध्यक्षपदासाठी त्यांची दावेदारी मजबूत केली आहे. विद्यमान सभापती किरण थोरे व माजी अध्यक्ष जयश्री पवार, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, अर्पणा खोसकर यांच्यासह अपक्ष रूपांजली माळेकर यांनीही दंड थोपटल्याची चर्चा आहे. शिवसेनेत अध्यक्षपदासाठी जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह उदय सांगळे, संभाजी पवार, दीपक खुळे यांनीही त्यांच्या नातलगांना अध्यक्षपद मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार अनिल कदम आणि शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे या तिघांना निर्णय घेण्याचे अधिकार बहाल केल्याची चर्चा आहे. त्याअनुषंगाने राज्यमंत्री भुसे यांनी काही आमदारांसोबत तसेच विभिन्न पक्षाच्या स्थानिक प्रमुखांसोबत चर्चा सुरू केल्याचे समजते. (प्रतिनिधी)
शिवसेना-राष्ट्रवादीत अध्यक्षपदासाठी लॉबिंग
By admin | Updated: March 2, 2017 01:16 IST