खरीप हंगामासाठी जिल्ह्यात केवळ ४३५ कोटींचे कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST2021-05-30T04:13:21+5:302021-05-30T04:13:21+5:30
जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका आणि सहकार क्षेत्रातील बँका मिळून खरिपात शेतकऱ्यांना २७८० कोटी रुपये कर्ज वाटपाचे ...

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात केवळ ४३५ कोटींचे कर्ज वाटप
जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका आणि सहकार क्षेत्रातील बँका मिळून खरिपात शेतकऱ्यांना २७८० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी अद्याप निम्मेही कर्ज वाटप झालेले नाही. आतापर्यंत केवळ १६ टक्के कर्ज वाटप करण्यात आले आहे. कोरोनामुळे अनेक बँकांमध्ये उपस्थिती कमी आहे. त्याचबरोबर अनेक बँकांचे केवळ पैसे काढणे आणि पैसे भरणे एवढीच काम सुरू असून बाकी सर्व कामे पूर्णपणे ठप्प असल्याने कर्जवाटपाच्या कामात अडथळा येत असल्याचा दावा शासकीय यंत्रणांनी केला आहे. २८ मेपर्यंत जिल्ह्यात राष्टीयीकृत बँकांनी २३२ कोटी रुपये तर, जिल्हा बँकेने १५५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक कामगिरी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर्षी राष्ट्रीयीकृत बँकांवर अधिकाधिक जोर देण्यात आला असून या बँकांना तब्बल १८६९ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
चौकट-
राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज मिळविण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागते. संपूर्ण कागदपत्रे जमा करूनही जाचक अटींमुळे अनेक शेतकरी खरीप कर्जापासून वंचित राहात असल्याचा मागील काही वर्षांचा अनुभव आहे. गावोगावच्या विकास सहकारी सोसायट्यांमार्फत कर्जपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकरीवर्गांकडून होत आहे. नोटाबंदीनंतर अनेक सहकारी सोसायट्या अडचणीत आल्या असून, ग्रामीण भागातील अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सोसायट्यांचे कामकाज सुरळीत करावे, अशी मागणीही शेतकरीवर्गांकडून होत आहे.
चौकट-
बँकनिहाय कर्ज वाटप उद्दिष्ट (कोट)
राष्ट्रीयीकृत बँका - १८६९
खासगी बँका -३६८
ग्रामीण बँका - ८
सहकारी क्षेत्र - ५३५