दफनभूमीतील जिवंत इतिहास...
By Admin | Updated: January 21, 2017 00:16 IST2017-01-21T00:16:39+5:302017-01-21T00:16:53+5:30
ख्रिस्ती कब्रस्तान : जिल्हाधिकारी जॅक्सनसह विविध अधिकाऱ्यांच्या कबरी देतात साक्ष

दफनभूमीतील जिवंत इतिहास...
अझहर शेख : नाशिक
कब्रस्तान अर्थात दफनभूमी म्हटली की तेथे कबरींव्यतिरिक्त दुसरे असणार तरी काय? शहरातील सारडा सर्कल भागात असलेल्या ख्रिस्ती दफनभूमीमध्येदेखील शेकडो कबरी आहेत. ही दफनभूमी ऐतिहासिक असून इसवी सन १८०० पासूनच्या विविध कबरी या ठिकाणी आहेत. दफनभूमीत फेरफटका मारताना कबरींभोवती जिवंत इतिहास दडलेला आढळून येतो.
शहरातील एकमेव ख्रिस्ती दफनभूमी सारडा सर्कल येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या समोर आहे. या दफनभूमीमध्ये प्रवेश करताच पांढऱ्या संगमरवरी दगडात आकर्षक पद्धतीने बांधलेली लेप्रसी निर्मूलन मिशनच्या रोसाली हार्वे यांची १९३२ सालातली कबर नजरेस पडते. जणू ही कबर ख्रिस्ती धर्मीयांच्या आरोग्यसेवेची साक्षच देत आहे. उजव्याबाजूच्या पायवाटेने पुढे गेल्यास काळ्याभोर दगडामध्ये भक्कम बांधकाम असलेल्या पुरातन कबरी बघून नागरिक थक्क होतात. कब्रस्तानाच्या या उजव्या कोपऱ्यात ब्रिटिश राजवटीमधील भारतीय प्रशासकीय सेवेत असलेले विविध अधिकाऱ्यांच्या कबरी येथे पहावयास मिळतात. प्रत्येक कबरीवर इंग्रजीमध्ये दगडी बांधकामात संगमरवरी माहितीफलकही बसविण्यात आला आहे. यावरून कबर कोणाची आहे व त्याचे निधन कधी झाले तसेच तो कुठल्या सेवेत होता आदि प्रकारची माहिती सहज उपलब्ध होते. काळानुरूप काही कबरींची थोड्याफार प्रमाणात पडझड झाली आहे.
स्वातंत्र्यचळवळीचे नाशिक हे अत्यंत महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासात नाशिकसोबत विविध घटनांच्या संदर्भ आढळून येतो त्यामध्ये येथील विजयानंद चित्रपटगृहात २१ डिसेंबर १९०९ साली हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी आॅर्थर मेसन तिप्पेटस् जॅक्सन यांच्या गोळ्या झाडून हत्त्या केली होती. जॅक्सन यांची कबरदेखील या दफनभूमीत आहे. ख्रिस्ती दफनभूमीचा विविध मूलभूत समस्यांसाठी अद्याप संघर्ष सुरूच आहे. या ठिकाणी येणाऱ्या मयताच्या नातेवाइकांना निवाराशेडदेखील उपलब्ध होऊ शकलेले नाही. तसेच चॅपल उभारणीचे काम दीडवर्षांपूर्वी हातात घेतले गेले; मात्र अजूनही ते पूर्णत्वास येऊ शकलेले नाही. सध्या चॅपलचे काम ठप्प आहे. येथील पुरातन कबरींची होणारी पडझडदेखील संबंधितांकडून रोखली जात नाही. पुरातत्व विभागाच्या अखत्यारितीमधील हा विषय नसल्याने तेदेखील या ऐतिहासिक कबरींचे संवर्धन रोखण्यासाठी पावले उचलू शकत नाही.