चाऱ्याअभावी पशुधन धोक्यात !

By Admin | Updated: June 6, 2016 00:11 IST2016-06-05T22:36:30+5:302016-06-06T00:11:09+5:30

चाऱ्याअभावी पशुधन धोक्यात !

Livestock risk due to fodder! | चाऱ्याअभावी पशुधन धोक्यात !

चाऱ्याअभावी पशुधन धोक्यात !

खामखेडा : पावसाची खरी सुरु वात रोहिणी नक्षत्रापासून होते. रोहिणी नक्षत्र संपत आले तरी अजूनही पावसाची कुठलीही चिन्हे दिसत नसल्याने लांबलेल्या पावसामुळे आता शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर चाराटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे असलेला अल्प चारा संपला आहे. विकतचा चारा घेऊन जनावरे पोसणे मुश्कील झाले आहे. तेव्हा जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी खामखेडा परिसरात शेतकऱ्यांनी सुरुवातीला जेमतेम पावसावर रब्बी पिकांची पेरणी केली होती. नंतर पावसाने दीड महिना दांडी मारल्याने रब्बीची पाहिजे त्या प्रमाणात पिके आली नाही. ऐन पिकांच्या कापणीच्या वेळेस पावसाने धुमाकूळ घातल्याने चारा पावसाच्या पाण्याने भिजून मका, बाजरीचा कडबा खराब झाला होता. त्यामुळे चाऱ्याचे प्रमाण कमी झाले होते. शेतकऱ्याकडे साधारण मे महिन्यापर्यंत जनावरांना पुरेल एवढा चारा असतो. मे किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर साधारण पंधरा दिवसांनंतर सर्वत्र हिरवा चारा जनावरांना चरण्यासाठी शिवारात उपलब्ध होत असतो. परंतु चालू वर्षी मे महिना संपून जून महिना सुरू होऊन पाच-सहा दिवस झाले तरी पावसाचा कोठेही अंदाज दिसत नाही. शेतकऱ्यांकडचा चारासाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अनेक शेतकरी दुसरीकडे कोठे हिरवा चारा मिळतो का, याचा तपास करीत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींना थोड्या फार प्रमाणात पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी ज्वारीच्या कडब्याची पेरणी केली. त्या हिरव्या कडब्याचे चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. साधारण एक ओळीचा भाव चार-पाच हजार रुपये झाला आहे. या एका ओळीत एक ट्रॅक्टर ट्रॉंलीभर चारा येतो. काही तुरळक शेतकऱ्यांकडे उसाचा चारा आहे.
या उसाच्या एका सरीचे भाव (याला ग्रामीण भागात बेले म्हणतात) एक हजार ते पंधराशे रुपये झाला आहे. एका उसाच्या सरीत साधारण एक बैलगाडीभर चारा
येतो. त्यामुळे सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्याला आपले महागडे पशुधन जगविणे मुश्कील झाले आहे. हिरव्या चाऱ्याचा
भाव गगनाला भिडला आहे. तेव्हा तीन-चार शेतकरी एकत्र
येऊन ज्वारी किंवा उसाची खरेदी करून जनावरांसाठी चारा उपलब्ध करीत आहेत. आता सर्व पर्याय संपल्याने शासनाने जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून
होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Livestock risk due to fodder!