पशुधन अधिकारी लाच घेताना जाळ्यात
By Admin | Updated: October 13, 2015 23:50 IST2015-10-13T23:47:39+5:302015-10-13T23:50:54+5:30
पशुधन अधिकारी लाच घेताना जाळ्यात

पशुधन अधिकारी लाच घेताना जाळ्यात
सिन्नर : मध्यस्थामार्फत दीड हजार रुपयांची लाच घेणाऱ्या येथील पशुधन विकास अधिकाऱ्याला लाच प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली आहे. मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास सदर कारवाई करण्यात आली. ४ आॅक्टोबर रोजी येथील एका शेतकऱ्याची गाय वीज पडून ठार झाली. मृत गायीचे शवविच्छेदन येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी मानसिंग गुलाबराव शिसोदे यांनी केले होते.
सदर शेतकऱ्याला शासनाचा आपत्कालीन निधी मिळवण्यासाठी मृत गायीचा शवविच्छेदन अहवाल महसूल खात्याकडे देणे गरजेचे होते. शवविच्छेदन अहवाल देण्यासाठी शिसोदे यांनी शेतकऱ्याकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली
होती. शेतकऱ्याने आपल्याकडे पाचशे रुपये असल्याचे सांगितले होते. त्यावेळी शिसोदे यांनी पाचशे रुपये घेऊन दीड हजार रुपये नंतर आणून दे असे सांगितले होते. लाच प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, हवालदार विकास कंदीलकर, ढुमणे, पवार यांनी सापळा रचला होता. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)