पशुसेवकांच्या संपामुळे पशुधन धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:15 IST2021-07-28T04:15:46+5:302021-07-28T04:15:46+5:30
पांगरी : सुमारे सहा दिवसांपासून तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी संपावर आहेत. त्यांच्याबरोबर आता खासगी पशुवैद्यकीय ही ...

पशुसेवकांच्या संपामुळे पशुधन धोक्यात
पांगरी : सुमारे सहा दिवसांपासून तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी संपावर आहेत. त्यांच्याबरोबर आता खासगी पशुवैद्यकीय ही संपावर गेल्याने ऐन पावसाळ्यात आरोग्यसेवेअभावी पशुधन संकटात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण होऊ नये त्यासाठी शासन दरबारी पशुसेवकांच्या असलेल्या समस्या मांडून त्वरित संप मिटवून शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय सेवा सुरळीत करून देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य विजय गडाख, रवींद्र पगार, योगिता कांदळकर, तातू जगताप यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार राहुल कोताडे यांच्याकडे केली आहे.
कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, त्यात हा संप असल्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आलेले आहे. उपचाराअभावी जनावरे दगावण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, शेतकऱ्यांचा एकमेव दुग्धव्यवसाय हा आपले कुटुंब चालविण्यासाठी शिल्लक राहिला असून पशुधन वाचविण्याची गरज शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे. तसेच जवळपास सर्व शेतकऱ्यांकडे संकरित जनावरे असून आजारी पडल्यावर त्यांना वेळेत उपचार मिळाले नाही तर कमी कालावधीत ती दगावतात. त्यामुळे त्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणात हानी होते. खासगी पशुवैद्याला फोन केल्यास ते येत नाहीत व सरकारी पशुवैद्य म्हणतात की, जनावरे सरकारी दवाखान्यात घेऊन या. यात शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागात जवळपास सर्व शेतकरी वर्ग हा माळरानात राहतो. रानातून दुभती जनावरे, आजारी जनावरे आणणे शक्य होत नाही. तसेच पशुधन वैद्यकीय अधिकारी आल्यास शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक भुर्दंड बसतो. तसेच तालुक्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची पशुधनाच्या तुलनेत संख्या कमी आहे. त्यामुळे शासन दरबारी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून चाललेल्या पशुवैद्यकीय परीक्षकांचा संप मिटून शेतकरी वर्गाला पशुधन सेवा सुरळीत करून द्यावी. अन्यथा दोन ते तीन दिवसात संप न मिटल्यास व शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय सेवा मिळाली नाही तर शेतकऱ्यांच्या सहभागाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी यांना देण्यासह मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
फोटो - २७ सिन्नर१ संप
सिन्नर तालुक्यात सुरु असलेला पशुवैद्यकांचा संप मिटवून शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देताना पंचायत समितीचे गटनेता विजय गडाख, पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार.
270721\27nsk_16_27072021_13.jpg
सिन्नर तालुक्यात सुरु असलेला पशुवैद्यकांचा संप मिटवून शेतकऱ्यांना पशु वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देतांना पंचायत समितीचे गटनेता विजय गडाख, पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार.