भादवण परिसरात रिमझिम पावसाने पिकांना जीवदान
By Admin | Updated: July 31, 2015 23:12 IST2015-07-31T23:09:38+5:302015-07-31T23:12:00+5:30
भादवण परिसरात रिमझिम पावसाने पिकांना जीवदान

भादवण परिसरात रिमझिम पावसाने पिकांना जीवदान
विसापूर : भादवणसह गांगवण परिसरात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे. पावसाळा सुरू झाल्याापासून अद्याप एकही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे नद्या-नाले अद्याप कोरडे असून विहिरींच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. वेळीच पाऊस आला नाही तर भीषण परिस्थिती उद्भवणार आहे. गेल्या महिन्यात अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरिपाची पिके करपू लागली असतानाच रिमझिम पाऊस आल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. शेतीची कोळपणी, खते टाकणे, निंदणीची कामे उरकली असून कोबी लागवडीसाठी शेतकऱ्यांनी शेती तयार करून ठेवली आहे. कोबीची रोपे लावणीसाठी तयार आहेत रिमझिम पावसातच शेतकऱ्यानी कशीबशी कोबी लागवड करून घेतली. आता शेतकरी जोरदार पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. (वार्ताहर)