विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 22:21 IST2016-01-05T22:04:54+5:302016-01-05T22:21:18+5:30
चिंचोली शिवार : वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
नायगाव : सिन्नर तालुक्यातील चिंचोली शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. विहिरीत जाळी टाकून बिबट्याला ओढण्यात आले. विहिरीच्या काठापर्यंत येताच बिबट्याने बाहेर उडी मारत डोंगराकडे धूम ठोकली.
चिंचोली गावाच्या डोंगरालगत पंडित महादू सानप यांची वस्ती आहे. याच शिवारातील गट नं. १९७ मध्ये सानप यांच्या मालकीची ४० फूट खोल विहीर आहे. मंगळवारी सकाळी
८ वाजेच्या सुमारास सानप यांचा मुलगा दिलीप हा विद्युतपंप सुरू करण्यासाठी विहिरीकडे गेला होता. यावेळी दिलीप याला विहिरीतून बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आल्याने त्याने विहिरीत डोकावले. विहिरीतील कपारीत बिबट्याने आश्रय घेतल्याचे त्याला दिसून आले. विहिरीत सुमारे २० फूट पाणी असल्याने पोहून दमलेला बिबट्या कपारीवर बसून मदतीच्या प्रतीक्षेत होता. दिलीप याने विहिरीत बिबट्या असल्याची बातमी ग्रामस्थांना दिल्याने घटनास्थळी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली
होती.
पोलीसपाटील मोहन सांगळे यांनी सदर घटनेची माहिती सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप भामरे यांना फोनद्वारे कळवली. सिन्नर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके, आर.एम. सांगळे, अनिल साळवे, रवींद्र सोनार, वनरक्षक चंद्रकांत आव्हाड, राजाराम उगले, तुकाराम डावरे, ईश्वर पवार, पंढरीनाथ तांबे आदिंसह वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या विहिरीत पडण्याच्या सातत्याने घडणाऱ्या घटना लक्षात घेऊन वनविभागाने बनविलेली विशेष सुती जाळी ग्रामस्थ व वनकर्मचाऱ्यांनी विहिरीत सोडली. तिच्या साहाय्याने बिबट्या बाहेर आला.(वार्ताहर)