ललित साहित्यावर शाब्दिक जुगलबंदी

By Admin | Updated: September 29, 2014 00:24 IST2014-09-29T00:24:38+5:302014-09-29T00:24:50+5:30

परिसंवाद : ललित साहित्याच्या आवश्यकतेला कौल

Literal Jugalbandi in Fine Literature | ललित साहित्यावर शाब्दिक जुगलबंदी

ललित साहित्यावर शाब्दिक जुगलबंदी

नाशिक : जगण्याला भिडण्याची ताकद ललित साहित्यात आहे आणि ललित साहित्याशी समाजाचे नाते जन्मजन्मांतरीचे असल्याचा सूर ललित साहित्याचे समर्थक लावत असताना, ललित साहित्याची समाजाला तिळमात्र गरज नाही आणि खांडेकर-फडके वाचून सामान्य माणसाची दुपारची भूक काही भागणार नाही, असा हल्ला विरोधकांनी चढविला. सावानाच्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यात रंगतदार ठरलेल्या परिसंवादात शाब्दिक जुगलबंदी झडल्यानंतर अध्यक्ष असलेल्या प्रा. दिलीप धोंडगे यांनी कास्टिंग व्होटचा वापर करत ललित साहित्याच्या बाजूने कौल दिला.
सावानाच्या साहित्यिक मेळाव्यात डॉ. चंद्रकांत वर्तक स्मृती परिसंवादात ‘समाजाला ललित साहित्याची गरज नाही’ या विषयावर प्रा. अनंत येवलेकर, अभय सदावर्ते, डॉ. सतीश श्रीवास्तव, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे आणि प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी आपआपली मते मांडली. कवी किशोर पाठक यांनी समन्वयकाची भूमिका निभावली. प्रा. अनंत येवलेकर यांनी बीजभाषण करताना सांगितले, लालित्य हे ईश्वरासारखे असते. ते दाखवता येत नाही. जोवर फुलांना वास आहे तोवर ललित साहित्याची समाजाला गरज भासणारच आहे. जे खपले जात नाही, वाचले जात नाही म्हणून त्याची समाजाला गरज नाही, हे त्रैराशिक मांडले जाते ते तितकेसे खरे नाही. काही ललितकृती दिशाभूल करतात; पण जगण्याला भिडण्याची ताकद ललित साहित्यात आहे. अभय सदावर्ते यांनी बीजभाषकावरच प्रहार करत भुसभुशीत मांडणीवर आक्षेप घेतले. तुमची इयत्ता तपासून पहा, असा सल्लाही देण्यात आला. जे उत्स्फूर्त आहे ते नक्कीच वाचले जाईल. ललित साहित्याला कसलाही आधार नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सतीश श्रीवास्तव यांनी ललित साहित्याला अच्छे दिन आले असल्याचे सांगत त्याचे डबके झाले नसल्याचे स्पष्ट केले. प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनीही ललित साहित्य जगण्याला भिडत नसल्याचे सांगत नवे लेखनबंध विकसित करण्याची कल्पना मांडली. ललित लेखकाला कुणी किंमत देत नाही. त्यामुळे जे भावेल ते बेधडक लिहा, असेही बोऱ्हाडे यांनी सांगितले. याचवेळी शं. क. कापडणीस, अपर्णा वेलणकर, स्वानंद बेदरकर, सुनील देशपांडे, मिलिंद जहागीरदार व चंद्रकांत महामिने यांनीही चर्चेत सहभाग नोंदविला. परिसंवादाचा समारोप करताना प्राचार्य दिलीप धोंडगे म्हणाले, अवघा समाज हा साहित्योकुजीवी आहे. समाजाला संघटित करण्याचे आणि मूल्य टिकवून ठेवण्याचे काम साहित्य करत असते. साहित्य हे जगण्याची प्रबळ ऊर्मी, प्रेरणा निर्माण करते. ललितबंधातूनच ते उत्तम रीतीने प्रकट होते. ज्ञानेश्वरीतील ओव्या आणि तुकोबाच्या अभंगांचा आजही आधार घेतला जातो. ललित साहित्याचे सामर्थ्य त्यात आहे. साहित्य हे जीवनदर्शनाचे काम करते. त्यामुळे समाजाला ललित साहित्याची गरज असल्याचेही धोंडगे यांनी ठामपणे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Literal Jugalbandi in Fine Literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.