दोनशे ठेवीदारांची यादी निश्चित
By Admin | Updated: August 2, 2016 02:01 IST2016-08-02T02:01:00+5:302016-08-02T02:01:12+5:30
‘मैत्रेय’ प्रकरण : बॅँक खात्याची माहिती देण्यासाठी ‘कॉल’

दोनशे ठेवीदारांची यादी निश्चित
नाशिक : मैत्रेय कंपनीच्या ठेवीदारांना परताव्याची देय रक्कम वाटप करण्यास जिल्हा न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या अंतर्गत ज्यांच्या ठेवींची मुदत संपली आहे, अशा दोनशे ठेवीदारांची यादी समितीने निश्चित केली आहे. ठेवीदारांचा परतावा देण्याकामी नियुक्त करण्यात आलेल्या समितीकडे सर्व ठेवीदारांची माहिती उपलब्ध आहे. ज्या ठेवीदारांची मुदत संपून जास्त कालावधी लोटला आहे, अशा ठेवीदारांना प्राधान्य द्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
समितीमध्ये ‘मैत्रेय’चे प्रतिनिधी असून, त्यांच्यामार्फत पोलिसांकडे कंपनीच्या सर्व ठेवीदारांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे सदर माहितीच्या आधारे समितीकडून न्यायालयाच्या आदेशानुसार टप्प्याटप्प्याने ठेवीदारांच्या परताव्यासंदर्भात याद्या जाहीर तयार केल्या जात आहे. पहिल्या टप्प्यातील सुमारे दोनशे नाशिक जिल्ह्यातील ठेवीदारांची यादी तयार असून, या सर्व ठेवीदारांना त्यांच्या बॅँक खात्याची संपूर्ण माहिती, ओळखीच्या पुराव्याच्या सत्य प्रती पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी ‘कॉल’ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक व समितीचे मुख्य सदस्य डॉ. सीताराम कोल्हे यांनी दिली आहे. येत्या शुक्रवार (दि.५) पर्यंत सर्व ठेवीदारांची आवश्यक ती सर्व बॅँक खात्याची वैयक्तिक माहिती प्राप्त होणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेसमार्फत सर्व ठेवीदारांच्या बॅँक खात्यात रक्कम एस्क्रो खात्यातून वर्ग करण्यात येणार असल्याचे कोल्हे म्हणाले.
मैत्रेय घोटाळ्यात एकूण ३१ कोटी २७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तक्रारदारांची संख्या जवळपास चौदा हजारांहून अधिक आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात मैत्रेय ठेवीदारांच्या वाढत्या गर्दीमुळे कामकाजावर परिणाम होत होता. त्यामुळे अखेर पोलीस प्रशासनाने शनिवारी प्रसिद्धीपत्रकान्वये ठेवीदारांना आवाहन केले होते. त्यामुळे कंपनीच्या ठेवीदारांनी पोलीस ठाण्यामध्ये जरी अर्ज दिला नसला तरी त्यांना कंपनीच्या धोरणानुसार त्यांची देय रक्क म वाटप केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट आहे.
नाशिक जिल्ह्यातील १२५ ठेवीदारांना देय रकमेचे डिमांड ड्राफ्ट नुकतेच पोलीस आयुक्तांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)