Nashik Crime: राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गोवा राज्यात निर्मित मद्याची तस्करी एका मालवाहू मिनी टेम्पोमध्ये लाकडी भुशाच्या पोत्यांआड दडवून केली जात होती. उत्पादन शुल्क (एक्साइज) नाशिक ब विभागाच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीअधारे सापळा रचून तस्करीचा डाव उधळला. टेम्पोसह सुमारे २३ लाख ३७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.
नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात अवैध मद्यवाहतूक, साठा व विक्री होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने 'नेटवर्क' अधिक सक्रिय करत सतर्कता बाळगली असून, सर्व पथकांना 'अलर्ट' जारी करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभागाच्या उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या आदेशान्वये सर्व पथके सतर्क झाली आहेत. ब विभाग भरारी पथकास मिळालेल्या माहितीआधारे पथकाने बुधवारी (दि.१८) पाथर्डी फाटा येथील सर्कलजवळ सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास पांढऱ्या रंगाचा टेम्पो (एमएच १४ ईएम ६९११) संशयास्पदरीत्या येताना पथकाला दिसला. पथकाने त्यास थांबण्याचा इशारा केला. टेम्पो थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये लाकडी भुसा भरलेली पोती दर्शनी भागात रचून ठेवण्यात आलेली होती. त्या पोत्यांपाठीमागे मद्याच्या बाटल्यांचे २८५ खोके आढळून आले. पथकाने संशयित टेम्पोचालक अमजद शेरखान पठाण (२३, रा. येरमाळा, ता. कळम, जि. धाराशिव) यास अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, दारूचा हा साठा कोणाला पुरविण्यात येणार होता? कोठून आणण्यात आला होता? याबाबतचा तपास पथकाकडून केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.