दारू दुकान विरोधकांचे होणार जाबजबाब
By Admin | Updated: May 7, 2017 00:11 IST2017-05-07T00:11:12+5:302017-05-07T00:11:24+5:30
नाशिक : दारू दुकानांविरोधात अलीकडेच समाजमनाकडून अचानक होऊ लागलेल्या विरोधामुळे राज्य उत्पादन शुल्क तसेच पोलीस खातेही चक्रावले

दारू दुकान विरोधकांचे होणार जाबजबाब
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वर्षानुवर्षे मद्यविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दारू दुकानांविरोधात अलीकडेच समाजमनाकडून अचानक होऊ लागलेल्या विरोधामुळे राज्य उत्पादन शुल्क तसेच पोलीस खातेही चक्रावले असून, दारू दुकाने बंद करणारे आंदोलक व विरोधकांच्या नावानिशी जाब जबाब घेऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क खात्याने घेतल्यामुळे खात्री पटल्याशिवाय मद्यविक्रीची दुकाने बंद होण्याची शक्यता तशी कमीच आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गाच्या पाचशे मीटर अंतरातील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर या आदेशाचा आधार घेत शहरी व ग्रामीण भागात सुरू असलेल्या देशी-विदेशी दारू विक्रीची दुकानेही बंद करण्यात यावी यासाठी ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. त्यासाठी धरणे, मोर्चे काढले जात असून, काही ठिकाणी नागरिकांनीच कायदा हातात घेऊन दुकाने बंद करण्याची कारवाई केली आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेली ही दुकाने गेल्या अनेक वर्षापासून मद्यविक्री करीत असून, त्यासंदर्भात कधीही स्थानिक नागरिकांनी हरकती वा विरोध केलेला नाही किंबहुना तशी नोंद संबंधित पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क खात्याकडेही करण्यात आलेली नाही; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रत्येकच मद्यविक्रीची दुकाने बंद करावीत यासाठी आंदोलने होऊ लागल्याचे पाहून राज्य उत्पादन शुल्क खात्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. दारू दुकाने बंद करण्याच्या मागणीमागचे सत्य तपासून पाहण्यासाठी ज्या ज्या नागरिकांनी दुकान बंद करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याकडे तक्रारी वा निवेदने दिली आहेत अशा दुकानांची तसेच आंदोलनकर्त्याची चौकशी करण्यात येणार असून, नागरिकांच्या तक्रारीची शहानिशा करून राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे. यासाठी विरोधकांचे जाब जबाब नोंदवून घेतले जाणार आहेत. आंदोलनकर्त्यांची तक्रार व वस्तुस्थिती तपासून जिल्हाधिकारी या संदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यामुळे निव्वळ आंदोलन केले म्हणून दारू दुकान बंद होईल अशी अपेक्षा बाळगणे गैर आहे.