मद्यपी मनोरुग्णाचा जिल्हा रुग्णालयात धुमाकूळ
By Admin | Updated: September 12, 2016 01:49 IST2016-09-12T01:46:36+5:302016-09-12T01:49:06+5:30
मद्यपी मनोरुग्णाचा जिल्हा रुग्णालयात धुमाकूळ

मद्यपी मनोरुग्णाचा जिल्हा रुग्णालयात धुमाकूळ
नाशिक : सिडकोतील मोरवाडी परिसरात मद्यपी मनोरुग्णाने एकास गंभीर दुखापत करून जखमी केल्याची घटना रविवारी (दि़११) दुपारच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे या जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना हा मद्यपी रुग्णालयात येऊन पोहोचला व त्याने चांगलाच गोंधळ घातला़ अखेर त्या मनोरुग्णाबाबत रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी सरकारवाडा पोलिसांना माहिती देताच त्यांनी त्यास ताब्यात घेतले़
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोरवाडीतील ज्ञानेश्वर सांगळे यांच्यावर मद्यपी मनोरुग्ण अजय पवार (रा़पाथर्डी फाटा) याने मारहाण केली़ यानंतर अंबड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पवारला ताब्यात घेतले तर जखमी सांगळे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच मनोरुग्ण सांगळे रुग्णालयात पोहोचला व तुझा खून करतो असे म्हणून अंगावर धावून गेला़ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगळे यांचा जीव वाचवून पवारला बाहेर काढले़
मात्र माझ्या पायावर उपचार करा असे जोरजोराने ओरडत मनोरुग्ण पवार पुन्हा रुग्णालयात घुसला व रुग्णालयीन कर्मचारी तसेच स्टाफला शिवीगाळ करू लागला़ ही बाब रुग्णालयाबाहेरील पोलीस चौकीतून सरकारवाडा पोलिसांना कळविताच एक पथक रुग्णालयात दाखल झाले़ पोलिसांना पाहताच पवार हा स्वच्छतागृहात जाऊन लपला़ मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करून त्यास ताब्यात घेतले असता त्याने पुन्हा आरडाओरड सुरू केली होती़ (प्रतिनिधी)