कपालेश्वरच्या पूजेसाठी आता लिंगायत समाजाचा दावा
By Admin | Updated: July 28, 2016 01:44 IST2016-07-28T01:39:16+5:302016-07-28T01:44:29+5:30
कपालेश्वरच्या पूजेसाठी आता लिंगायत समाजाचा दावा

कपालेश्वरच्या पूजेसाठी आता लिंगायत समाजाचा दावा
नाशिक : कपालेश्वर मंदिरातील गाभाऱ्यात आणि विशेषत: मूर्ती पूजेसाठी वीर शैव लिंगायत समाजाने दावा केला असून त्यासंदर्भात त्यांनी विश्वस्तांना निवेदन दिले आहे. मंदिरात पूजेचा अधिकार न मिळाल्यास संघर्षाची तयारी केल्याने भविष्यात हा वाद वाढण्याची शक्यता आहे. कपालेश्वर मंदिरात पुजाऱ्यांशिवाय कोणालाही प्रवेश नाही. त्यामुळे विश्वस्तांनाही प्रवेश दिला जात नाही. मध्यंतरी तृप्ती देसाई यांच्या माध्यमातून गाभाऱ्यात प्रवेशाचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी भाविकांनी एकजुटीने त्यांचा प्रवेश होऊ दिला नाही. इतकेच नव्हे तर, त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर हा विषय बाजूला पडला असला तरी आता वीर शैव लिंगायत समाजाने शिवलिंग पूजेसाठी आग्रह धरला आहे. समाजाच्या एका संघटनेने यासंदर्भात माहिती मिळवली असून अनेक वर्षांपूर्वी लिंगायत समाजाच्या वतीनेही कपालेश्वराची पूजा-अर्चा केली जात असल्याचे आढळले असल्याचा त्यांचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळावा आणि पूजेचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी बुधवारी (दि. २७) कपालेश्वर मंदिराच्या विश्वस्तांना निवेदन दिले आहे. शिवपिंडीच्या पूजेचा आद्य अधिकार लिंगायत समाजाचाच असल्याचा दावा निवेदनात केला आहे. या प्रकारामुळे पूजेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)