कमळ फुलूनही सेनेचे आव्हान कायम

By Admin | Updated: February 25, 2017 01:14 IST2017-02-25T01:14:26+5:302017-02-25T01:14:42+5:30

कॉँग्रेस, माकपा नेस्तनाबूत : भाजपाच्या घोडदौडीने राजकीय गणितं बदलणार

The lily will also face the challenge of the army | कमळ फुलूनही सेनेचे आव्हान कायम

कमळ फुलूनही सेनेचे आव्हान कायम

सातपूर : एका जागेवर असलेल्या सेनेला पाच जागा, तर एकाच जागेवरील भाजपाला नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत आठ जागा मिळाल्याने सातपूर विभागावर तसे म्हटले तर भाजपा वरचढ ठरली असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अंगाने पहायचे झाल्यास भाजपाला अधिक जागा मिळूनही त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होईलच याची छातीठोक खात्री देता येणार नाही.  सिडकोप्रमाणेच कामगार वर्गाचा भरणा असलेल्या सातपूरवासीयांनी प्रत्येक निवडणुकीत कोणा एका पक्षामागे फरफटत जाण्याची भूमिका कधीच घेतली नाही, त्यामुळे सर्वपक्षीयांना सातपूरने साथ दिल्याने येथील राजकीय वातावरणही निकोप राहिले. परंतु पक्षीय पातळीवर चर्चा करायची झाल्यास गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच भाजपाला सातपूरमध्ये ‘अच्छे दिन’ पहावयास मिळाले. साधारणत: १९९७ च्या निवडणुकीत कमल विधाते यांनी भाजपाची उमेदवारी करून महापालिकेत प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर मात्र भाजपाला थेट पंधरा-सतरा वर्षांची प्रतीक्षा करावी लागली.  दिनकर पाटील यांनी पोटनिवडणूक भाजपाकडून लढवून कमळ फुलविले खरे पण अर्थातच कमळ पाटील यांच्या कर्तुत्वाने फुलले, त्यात पक्षाचे योगदान तसे नव्हतेच. त्यामुळे काल-परवा झालेल्या निवडणुकीत भाजपाला लाटेचा जसा फायदा झाला तसाच तो निवडून येण्याची क्षमता असलेल्या आयात उमेदवारांमुळेही झाला.  एका जागेवर असलेल्या भाजपाला आठ जागांवर विजय मिळाला तर एकाच जागेवर असलेल्या सेनेलाही पाच जागांवर विजय मिळाल्याने सातपूरवर भाजपा व सेना या दोनच पक्षांना खऱ्या अर्थाने मतदारांनी कौल दिला, असे मानावे लागेल. गेल्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहा जागा होत्या, त्या घटून आता दोनच जागांवर पक्षाचे इंजिन थांबले असले तरी, त्या दोन्ही जागा पक्षावर नव्हे तर उमेदवारांच्या कुवतीवरच राखता आल्या हे सत्य नाकारून चालणार नाही. स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांच्या उमेदवारीचा हा विजय आहे. तथापि, पक्षाचे चिन्ह असल्याने त्या जागा मनसेच्या खात्यावरच जातील.
दिनकर पाटील यांनी चारही जागा खेचून आणल्या तशाच शशीकांत जाधव यांनीही चार जागा आपल्या ताब्यात घेतल्या. सद्यस्थितीत दिनकर पाटील व आमदार सीमा हिरे यांच्यातील ‘सख्य’ सर्वश्रृत असून, पाटील यांच्या पुत्राच्या पराभवास हिरे याच कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढून तशी तक्रारही पाटील यांनी पक्षाकडे केली आहे. त्यावरून भाजपातील अंतर्गत कलहाची जाणीव होण्यास हरकत नसावी. अशा परिस्थितीत दोन वर्षांनी विधानसभेची निवडणूक झाल्यास त्याचे चित्र काय असेल याचे आडाखे आताच बांधले जात असले तरी, भाजपाच्या बरोबरीने सेनाही तितकीच पुढे आल्याने भाजपाला वाटते तितके सोपे असेल असे वाटत नाही.  गेल्या वीस वर्षांपासून सातपूरमधून रिपाइंकडून निवडून येणारे प्रकाश लोंढे यांचा पराभव तसा म्हटला तर धक्कादायक म्हणावा लागेल. अनेक राजकीय लाटा आल्या व गेल्या मात्र लोंढे यांचे स्थान कायम होते. यंदा मात्र भाजपाच्या लाटेत त्यांचा पालापाचोळा झाला.

Web Title: The lily will also face the challenge of the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.