वंशाच्या दिव्याचाच प्रकाश अधिक; मुलींच्या जन्मदरात घट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:31+5:302021-09-21T04:16:31+5:30

नाशिक : जिल्ह्यात गत दोन वर्षे सातत्याने घटलेला मुलींचा जन्मदर गत वर्षातही घटला होता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुलींच्या ...

The light of the lamp of the tribe is more; The decline in the birth rate of girls continues | वंशाच्या दिव्याचाच प्रकाश अधिक; मुलींच्या जन्मदरात घट कायम

वंशाच्या दिव्याचाच प्रकाश अधिक; मुलींच्या जन्मदरात घट कायम

नाशिक : जिल्ह्यात गत दोन वर्षे सातत्याने घटलेला मुलींचा जन्मदर गत वर्षातही घटला होता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुलींच्या जन्मदरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अर्थात हे एप्रिलपासून ऑगस्टपर्यंतचे चित्र असले तरी अजून पुढील सात महिन्यांनंतरच वर्षभराचे खरे प्रमाण समोर येणार आहे. एक हजार मुलांमागे गतवर्षी असलेला ९१२ हा मुलींचा जन्मदर वंशाच्या दिव्यासाठीचा अट्टहास काहीसा कमी झालेला असला तरी तो पूर्णत: नामशेष झाला नसल्याचेच निदर्शक आहे.

अनधिकृतपणे होणाऱ्या गर्भपातामध्ये मुलगी नको असणाऱ्यांचेच प्रमाण अधिक असते. गत तीन वर्षातही कन्या जन्मदरात घट झाली आहे.

नाशिक शहरात जन्मदरात २०१८-१९ यावर्षी १००० मुलांमागे मुलींचा जन्मदर ९२३ इतका होता. त्यानंतर २०१९-२० यावर्षी मुलींच्या जन्मदरात ३ने घट येऊन जन्मदर ९२०वर पोहोचला होता, तर २०२०-२१ या पहिल्या कोरोना लाटेनंतर मुलींच्या जन्मदरात तब्बल ८ ने घट येऊन ते प्रमाण ९१२वर पोहोचले होते. २०२१च्या एप्रिल महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसू लागल्यानंतर मात्र मुलींच्या जन्मदरात तब्बल १५ने वाढ हाेऊन गत ५ महिन्यांत सरासरी ९२७ इतका जन्मदर राहिला आहे. मात्र, कोरोनाच्या धास्तीमुळे ते गर्भपाताचे प्रमाण घटले असण्याची तसेच भविष्यातही ते कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इन्फो

५५६पैकी ३१७ साेनोग्राफी केंद्रे सुरू

गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंध कायद्याच्या तरतुदीनुसार सोनोग्राफी केंद्राला नोंदणी आवश्यक असते. त्यानुसार शहरातील ५५६ सोनोग्राफी केंद्रांपैकी २१५ केंद्रे कायमस्वरूपी बंद आहेत, तर २४ केंद्र कोर्ट केस आणि इतर कारणांमुळे बंद आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत केवळ ३१७ अधिकृत सोनोग्राफी केंद्रे सुरू आहेत.

इन्फो

मुलींचा जन्मदर असतो अधिक

वैज्ञानिकदृष्ट्या निसर्गत: मुलींचा जन्मदर हा मुलांपेक्षा अधिक असतो. त्यामुळे गर्भपातबंदी असलेल्या बहुतांश देशांमध्ये मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे १,०२५ ते १,०५० इतका असतो. मात्र, भारतातील अनेक राज्यांमध्ये आजही मुलींचा जन्मदर ९०० पेक्षाही कमी आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात हे प्रमाण ९२५च्या आसपास असून, नाशिक जिल्ह्यातही हे प्रमाण साधारण राज्याच्या सरासरीच्या प्रमाणात कायम आहे.

कोट

मुला-मुलींचे प्रमाण समतोल राहावे, यासाठी गर्भलिंग निदानाला प्रतिबंध करण्यात आला आहे. सोनोग्राफी केंद्राची पाहणी करून नियमित तपासणी करून त्या प्रमाणावर दर महिन्याला लक्ष ठेवले जाते, तसेच तपासणी करून काही दोष आढळून आल्यास कारवाई करण्यात येते, तसेच कुठे अवैधरित्या गर्भलिंग निदान होत असल्यास १८००२३३४४७५ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधल्यास तत्काळ दखल घेतली जाते.

डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, मनपा

-----------------

मुला-मुलींच्या जन्माची संख्या

वर्ष २०१८-१९, मुलींचा जन्मदर ९२३

वर्ष २०१९-२०, मुलींचा जन्मदर ९२०

वर्ष २०२०-२१, मुलींचा जन्मदर ९१२

वर्ष २०२१ ऑगस्टपर्यंत जन्मदर ९२७

(मुलींच्या जन्मदराचे प्रमाण हे १ हजार मुलांमागे आहे. )

Web Title: The light of the lamp of the tribe is more; The decline in the birth rate of girls continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.