चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप
By Admin | Updated: July 16, 2016 01:10 IST2016-07-16T01:00:20+5:302016-07-16T01:10:14+5:30
दिंडोरी तालुका : हॉटेल व भत्त्याच्या गाड्यासाठी पैशांची मागणी

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप
नाशिक : माहेरून पन्नास हजार रुपये आणत नाही तसेच चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या माहेरी जाऊन तिचा खून करणारा पती योगेश माधव दाभाडे (२९, रा़ फुलेनगर, नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़ एच़ मोरे यांनी जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ दिंडोरी तालुक्यातील खडक सुकेणेच्या वेताळवाडीत ३० मार्च २०१० रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती़
या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, खडक सुकेणेच्या वेताळवाडीतील हिरामण तुकाराम गणोरे यांची मुलगी सोनाली ऊर्फ अरुणा हिचा विवाह पेठरोडवरील योगेश दाभाडेसोबत झाला होता़ या दोघांच्या विवाहास पाच-सहा वर्षे उलटूनही सोनालीस तिचा भाया शिवाजी दाभाडे, सासू राधाबाई दाभाडे हे शारीरिक व मानसिक त्रास देत होते़ तर भेळभत्ता व हॉटेलचा गाडा सुधारण्यासाठी माहेरून पन्नास हजार रुपये घेऊन ये, असा तगादा पती व सासरकडील मंडळींकडून सुरू होता़
जिल्हा व सत्र न्यायाधीश मोरे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील सुप्रिया गोरे यांनी नऊ साक्षीदार तपासून पती योगेश दाभाडेविरोधात सबळ पुरावे सादर केले़ या खटल्यात योगेशला जन्मठेप तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)