संशयावरून पत्नीस जाळणाऱ्यास जन्मठेप
By Admin | Updated: December 22, 2015 23:05 IST2015-12-22T23:02:18+5:302015-12-22T23:05:14+5:30
कळवण तालुक्यातील कनाशी येथील घटना

संशयावरून पत्नीस जाळणाऱ्यास जन्मठेप
नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळणाऱ्या पतीस जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़ एम़ चौहान यांनी मंगळवारी (दि़२२) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़ कळवण तालुक्यातील कनाशी येथे चार वर्षांपूर्वी ही घटना घडली होती़
या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, कनाशी येथे मजुरी करणारा अनिल कृष्णा गांगुर्डे (२४) हा पत्नी भूमिकाच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे़ गांगुर्डे दाम्पत्यास पहिली कन्या झाल्यानंतरही त्याचा पत्नीस त्रास सुरूच होता़ मद्याच्या नशेत तो पत्नीस शिवीगाळ व मारहाणही करीत असे़ त्याची पत्नी दुसऱ्यांदा
गर्भवती राहिल्यानंतर तिच्यावर संशय घेत १० आॅगस्ट २०११ रोजी त्याने अंगावर रॉकेल टाकून तिला
पेटवून दिले़ यामध्ये गंभीर झालेल्या भूमिकास अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला़ मात्र तत्पूर्वी तिने पोलीस व तहसीलदारांकडे जबाब नोंदविला होता़
सरकारी वकील सुप्रिया गोरे यांनी न्यायालयात सात साक्षीदार तपासून भूमिकाचा मृत्यूपूर्वी जबाब सादर केला़ हा पुरावा ग्राह्ण धरून न्यायाधीश चौहान यांनी आरोपी अनिल गांगुर्डे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर सासरच्या इतर चौघांना पुराव्याअभावी निर्दोष सोडले़ (प्रतिनिधी)